धाराशिव (प्रतिनिधी)- पारंपारिक लावणी कलेचे संरक्षण आणि सध्या वाढत असलेल्या अश्लील डीजे लावणी सादरीकरणांवर नियंत्रण आणण्यासाठी राज्य सरकारने स्वतंत्र ‘सेन्सॉर बोर्ड समिती’ स्थापन करावी, अशी मागणी राष्ट्रवादी चित्रपट व सांस्कृतिक विभागाने केली आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देण्यात आले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्राची तमाशा व लावणी ही समृद्ध परंपरा असून लीलाताई गांधी, मधू कांबीकर, उषा चव्हाण, माया जाधव, लक्ष्मीबाई कोल्हापूरकर यांसारख्या कलाकारांनी या कलेला उंचीवर नेले. तसेच विठाबाई नारायणगावकर, मंगला बनसोडे, कांताबाई सातारकर, माया खुटेगावकर, छाया खुटेगावकर, सुरेखा पुणेकर, रेश्मा परतीकर, अप्सरा जळगावकर, शकुंतला नगरकर आदी कलाकारांनी पारंपारिक लावणी जतन केली आहे.
मात्र, सध्या ‘डीजे डान्स’ किंवा ‘स्टेज परफॉर्मन्स’च्या नावाखाली अश्लील आणि विवस्त्र सादरीकरणे वाढत असून, त्यामुळे सांस्कृतिक वारशाला धक्का बसत आहे. या पार्श्वभूमीवर पारंपारिक लावणीचे मूळ स्वरूप जपण्यासाठी स्वतंत्र सेन्सॉर बोर्ड स्थापन करावे, अश्लील हालचाली व अयोग्य वेशभूषेवर बंदी घालावी, तसेच कार्यक्रमांसाठी कडक निकष लागू करावेत.
तसेच, सादरीकरण केवळ मंचावरच करण्याची सक्ती, पारंपारिक वेशभूषा अनिवार्य करणे, नियमभंग करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करणे, तसेच रस्त्यावर किंवा ट्रॉलीवरून होणाऱ्या नृत्य सादरीकरणांवर बंदी घालावी. इतर राज्यांच्या धर्तीवर अश्लील नृत्य प्रकारांना आळा घालण्यासाठी कठोर धोरण आखण्याची आवश्यकता व्यक्त करण्यात आली आहे. लावणी ही केवळ मनोरंजन नसून महाराष्ट्राच्या संस्कृतीचा आत्मा असल्याने तिचे पारंपारिक व सन्माननीय स्वरूप जपण्यासाठी शासनाने तातडीने पावले उचलावीत, अशी मागणी प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कडे केली आहे.
