येडशी (प्रतिनिधी)- ‘जागतिक मलेरिया दिन’ निमित्त प्राथमिक आरोग्य केंद्र येडशीच्या वतीने गावात भव्य जनजागृती रॅली काढण्यात आली. बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर वाढत्या डासजन्य आजारांचा धोका लक्षात घेऊन आयोजित करण्यात आलेल्या या रॅलीत ग्रामस्थ, विद्यार्थी आणि आरोग्य कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या उपक्रमातून मलेरिया, डेंग्यू व चिकनगुनिया यांसारख्या आजारांविरोधात प्रभावी लढा उभारण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.
रॅलीचे उद्घाटन तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रमोद गिरी यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून करण्यात आले. यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की, “डासमुक्त परिसर ही केवळ गरज नसून आजची अत्यावश्यकता आहे. उपचारांपेक्षा प्रतिबंध अधिक प्रभावी असून ‘हिवतापमुक्त गाव’ ही संकल्पना प्रत्येक नागरिकाच्या सहभागातूनच शक्य आहे.”
रॅलीमध्ये जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक व विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला. “डास पळवा - देश वाचवा”, “स्वच्छता ठेवा - आजार टाळा” अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. विद्यार्थ्यांच्या फलकांमधून आरोग्यविषयक संदेश प्रभावीपणे ग्रामस्थांपर्यंत पोहोचले. वैद्यकीय अधिकारी डॉ. दर्शना शिंदे यांनी नागरिकांना डासजन्य आजारांविषयी शास्त्रोक्त माहिती देत खालील उपाययोजना काटेकोरपणे पाळण्याचे आवाहन केले. आठवड्यातून एक दिवस घरातील सर्व पाण्याची भांडी, टाक्या, कुलर पूर्णपणे रिकामे करून कोरडे ठेवावेत. यामुळे डासांची पैदास रोखली जाते. जुने टायर, फुटके डबे, प्लास्टिक, नारळाच्या करवंट्या यामध्ये पाणी साचणार नाही याची दक्षता घ्यावी. नाल्या व गटारी स्वच्छ आणि वाहत्या ठेवाव्यात. साचलेल्या पाण्यात जंतुनाशक फवारणी किंवा तेल टाकण्याची उपाययोजना करावी.
मच्छरदाणीचा वापर, खिडक्यांना जाळ्या, पूर्ण अंग झाकणारे कपडे यांचा वापर करणे आवश्यक आहे. ताप, अंगदुखी, डोकेदुखी, उलट्या, डोळ्यांच्या मागे वेदना अशी लक्षणे दिसल्यास विलंब न करता जवळच्या आरोग्य केंद्रात तपासणी करावी. या मोहिमेत समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. विलास तोडकर, आरोग्य सहाय्यक सुरेश गंगावणे, सुनील कदम, सोहेल कुरेशी, तसेच आरोग्य सेवक गजानन सुतार, युवराज चौगुले, साहेबराव राठोड आणि आशा स्वयंसेविकांनी घरोघरी भेटी देऊन जनजागृती केली. पाणी साचलेल्या ठिकाणांची पाहणी करून तात्काळ उपाययोजना राबवण्यात आल्या.
या अभियानामुळे ग्रामस्थांमध्ये डेंग्यू व मलेरियाबाबत जागरूकता वाढली असून स्वच्छतेबाबत सकारात्मक बदल दिसून येत आहे. आरोग्य विभागाने नागरिकांना आवाहन केले आहे की, “रॅलीपुरतेच न थांबता स्वच्छता आणि प्रतिबंधात्मक सवयी दैनंदिन जीवनात अंगीकारा.”येडशी येथे आयोजित ही जनजागृती रॅली केवळ एक कार्यक्रम न राहता आरोग्यदायी समाजनिर्मितीकडे टाकलेले ठोस पाऊल ठरली आहे. नागरिकांच्या सक्रिय सहभागातून ‘डासमुक्त व आजारमुक्त गाव’ ही संकल्पना प्रत्यक्षात येण्याचा विश्वास आरोग्य प्रशासनाने व्यक्त केला आहे.
