धाराशिव (प्रतिनिधी)- जिल्ह्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांबाबत सातत्याने घडत असलेल्या अवमानकारक व बेकायदेशीर घटनांमुळे सामाजिक वातावरण ढवळून निघाले असून, प्रशासनाची निष्क्रियता संशयास्पद असल्याचा थेट आरोप रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (खरात) चे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ राऊत यांनी केला आहे. दोषींवर तात्काळ गुन्हे दाखल करून कडक कारवाई न झाल्यास जिल्हाभर तीव्र आंदोलन उभारण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
मागील काही दिवसांत येडशी, कळंब तालुक्यातील मस्सा व शिराढोण येथे मध्यरात्री विनापरवानगी पुतळे बसविण्याच्या घटना घडल्या आहेत. या घटनांमुळे कायदा व सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. त्याचबरोबर वाशी येथील पारा चौकात डॉ. आंबेडकर यांचा पुतळा हटवून दुसरा पुतळा बसविण्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तसेच भूम येथे आंबेडकर पुतळ्यासाठी आरक्षित जागेवर दुसरा पुतळा बसविण्याचा प्रयत्न झाल्याने परिस्थिती अधिकच चिघळली आहे. त्यामुळे प्रशासनाने कारवाई करावी, अन्यथा आंदोलन करण्यात येईल अशा इशारा राऊत यांनी दिला आहे.
