तुळजापूर (प्रतिनिधी)-  श्री तुळजाभवानी मंदिरातील ‌‘भवानीशंकर सभा मंडप‌’  साठी लागणाऱ्या दगडी खांब  निर्माण करणे काम अंतिम टप्प्यात पोहोचले असून या प्रगतीचा सविस्तर आढावा आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी घेतला. यावेळी तुळजाभवानी मंदिर संस्थांच्या प्रशासकीय व्यवस्थापक तथा तहसीलदार माया माने, अभियंता प्रवीण अमृतराव, सहसंबंधित कारागीर ठेकेदार उपस्थित होते. श्री तुळजाभवानी मातेच्या मंदिरातील भवानी शंकर मंडप पाटील काही खांबांना चिरे गेल्याने तिथे नवीन तयार केलेले खांब तसेच दुरुस्ती केलेले काम उभारण्यात येणार आहे. मंदिराच्या वैभवात भर घालणारे हे काम लवकरच पूर्णत्वास जाणार असल्याने भाविकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.

पारंपरिक शैलीत भव्य खांबांची निर्मिती केली जात आहे. या प्रकल्पाअंतर्गत सुमारे 39 भव्य खांबांची निर्मिती सुरू असून, त्यासाठी नांदेड जिल्ह्यातील होट्टल येथून आणलेल्या जवळपास 1,600 घनफूट काळ्या पाषाणाचा वापर करण्यात येत आहे. मंदिराचे मूळ प्राचीन स्वरूप अबाधित राखत, पारंपरिक आणि ऐतिहासिक स्थापत्यशैलीतच या खांबांची कोरीव रचना केली जात आहे.  या कामात पारंपरिक कलेला आधुनिकतेची जोड दिली जात आहे. या कामात प्राचीन स्थापत्यकलेचा वारसा आणि आधुनिक तांत्रिक कौशल्य यांचा सुरेख संगम साधण्यात आला आहे. खांबांवरील कोरीव नक्षीकाम मंदिराच्या सौंदर्यात नवी भर घालणारे ठरणार आहे.

 

राजस्थान, उत्तर प्रदेशातून आणले कुशल कारागीर

हे खांब निर्मितीसाठी निष्णात कारागिर अथक परिश्रम  घेत आहेत. राजस्थान आणि उत्तर प्रदेश येथील सुमारे 12 कुशल कारागीर दिवसरात्र मेहनत घेत असून प्रत्येक खांब बारकाईने साकारला जात आहे. सदरील खांब लवकरच बसवणीस सुरुवात होणार आहे. खांबांच्या निर्मितीचे काम अंतिम टप्प्यात आले असून, लवकरच हे कोरीव खांब ‌‘भवानीशंकर सभा मंडप‌’मध्ये बसवण्याचे काम सुरू होणार आहे. भवानी शंकर मंडप भाविकांसाठी आकर्षणाचा नवा केंद्रबिंदू ठरणार आहे. हे सुशोभीकरण पूर्ण झाल्यानंतर तुळजाभवानी मंदिराचा ऐतिहासिक व सांस्कृतिक वारसा अधिक समृद्ध होणार असून, भवानीशंकर सभा मंडप भाविकांसाठी विशेष आकर्षण ठरणार आहे.

 
Top