धाराशिव (प्रतिनिधी)-  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना सामाजिक कार्यकर्त्यांना अनेक अडथळे निर्माण केले गेले. त्या अडथळ्यांवर मात करीत त्यांनी काम सुरूच ठेवले. त्याच वेळी पेशवाई काळामध्ये दलितेत्तवर समाजावर देखील पेशव्यांनी मोठ्या प्रमाणात बंधने लादली होती. तीच रग बाबासाहेबांनी पकडली. पुणे करार सुरू होता. त्यावेळी रक्ताने लिहिलेली धमकी देणारी पत्र बाबासाहेबांना यायची. त्यामुळे बाबासाहेबांना कोणताही धोका होऊ नये यासाठी बाबासाहेबांच्या संरक्षणासाठी दलितेत्तर लोक रात्रभर पहारा देत असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत योगीराज बागुल यांनी केले.

धाराशिव शहरातील नालंदा फॅशन डिझायनिंग महाविद्यालयात डॉ बाबासाहेब आंबेडकर विचार मंचच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या डॉ बाबासाहेबांचे दलितेत्तर सहकारी या विषयावर ते बोलत होते. यावेळी बीड येथील नालंदा फाउंडेशनचे अध्यक्ष प्रदीप रोडे, विचार मंचचे अध्यक्ष प्रा. रवी सुरवसे व अरुण बनसोडे आदी उपस्थित होते. तर प्रदीप रोडे म्हणाले की, डॉ. बाबासाहेबांनी नदीजोड प्रकल्प, देशी-विदेशी नीती याची देखील सविस्तर मांडणी केली आहे. तर ओबीसी व हिंदू कोड बिलासाठी त्यांनी राजीनामा दिला असे सांगितले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मारोती पवार यांनी तर सूत्रसंचालन राजेंद्र अंगरखे यांनी व उपस्थितांचे आभार नागनाथ गोरसे यांनी मानले. 



तिसरे महात्मा प्रबोधनकार

पुढे बोलताना बागुल म्हणाले की, सिताराम चिंतामणराव जोशी हे बाबासाहेबांनी स्थापन केलेल्या संस्थेचे संस्थापक होते. बाबासाहेब ब्रिटिश सरकारच्या काळात 1942 मध्ये चार खात्यांचे केंद्रीय मंत्री झाले. त्यावेळी त्यांनी जोशी यांना मुख्य कामगार आयुक्त होण्याची संधी बाबासाहेबांनी दिले असल्याचे त्यांनी सांगितले. तर लोकमान्य टिळक यांचे पुत्र श्रीधर पंत व रामभाऊ पंत हे दोघेजण समाज समता संघाचे सदस्य झाले होते. दलितांना केसरी वाड्यात प्रवेश करण्याची बंदी होती. त्या काळात समाज समता संघाची शाखा बाबासाहेबांच्या हस्ते उघडल्याचे त्यांनी सांगितले. महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यानंतर जर तिसरा महात्मा म्हणायचे असेल तर केशव सिताराम ठाकरे उर्फ प्रबोधनकार यांना व लोकमान्य म्हणायचे असेल तर श्रीधर टिळक यांना म्हणावे असे आवाहन त्यांनी केले.

 
Top