भूम (प्रतिनिधी)-  कसबा येथील श्रीराम मंदिरात राम नवमी व हनुमान जयंती उत्सवाच्या निमित्ताने आयोजित संगीत मैफिलीत नांदेडचे किराणा घरणा प्रसिद्ध गायक प्रा. धनंजय जोशी यांनी आपल्या सुमधुर गायकीने भूमकर श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. “बाजे रे मुरलीया बाजे“ या गवळणीने मैफिलीत रंगत आणली, तर त्यांच्या आवाजात श्रोत्यांना साक्षात स्वरभास्कर पंडित भीमसेन जोशी यांच्या स्वरांचा प्रत्यय आला. 

स्वरांची जुगलबंदी आणि भक्तिरसाची उधळण 2 एप्रिल रोजी रात्री 9 वाजता या मैफिलीचा प्रारंभ पखवाज आसाराम साबळे आणि तबल्याच्या हनुमंत फडतरे बहारदार जुगलबंदीने झाला. तालवाद्यांच्या या वादनाने वातावरणात एक वेगळीच ऊर्जा निर्माण केली. त्यानंतर प्रा. धनंजय जोशी यांनी “तुझी मूर्ती सुंदर देवा“ या अभंगाने आपल्या गायनाचा श्रीगणेशा केला. 

त्यांनी आपल्या खड्या आवाजात “पद्मनाभ नारायणा“ आणि “आधी रचली पंढरी मग वैकुंठ नगरी“ हे अभंग सादर केले. या भक्तीगीतांनी उपस्थित प्रेक्षकांना टाळ्या वाजवण्यास भाग पाडले. केवळ शास्त्रीय आणि भक्ती संगीतच नव्हे, तर “हे सुरांनो चंद्र व्हा“ हे भावगीतही त्यांनी अत्यंत नजाकतीने सादर करून रसिकांची मने जिंकली.  पंडित भीमसेन जोशींच्या स्मृतींना उजाळा प्रा. धनंजय जोशी यांच्या गायनाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्यांचा आवाज आणि गायकीची ढब. त्यांच्या आवाजात भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांची हुबेहूब झलक पाहायला मिळाली. जणू स्वरभास्करच प्रत्यक्ष समोर गात आहेत, असा भास श्रोत्यांना होत होता. “तो नर धन्य तिन्ही लोकी राम नाम ज्याचे मुखी“ ही भैरवी सादर केली. या मैफिलीला साजेसी साथसंगत पेटी सुरेश फडतरे यांनी केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ए. पी. देशपांडे यांनी केले. 

 
Top