धाराशिव (प्रतिनिधी)-  घरभाडे मागितल्याच्या रागातून एका भाडेकरूने घरमालकावर लोखंडी कोयत्याने वार करत जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना धाराशिव शहरातील बार्शी रोड परिसरात घडली. रविवारी (ता. 12) सायंकाळी सव्वासातच्या सुमारास ही घटना घडली. या हल्ल्यात घरमालक गंभीर जखमी झाले असून, याप्रकरणी सोमवारी (ता. 13) धाराशिव शहर पोलिस ठाण्यात भाडेकरूवर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राजेश अनिल झोंबाडे असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपी भाडेकरूचे नाव आहे. याप्रकरणी जखमी घरमालकाचा मुलगा शैलेंद्र राजाभाऊ स्वामी (वय 37, रा. आदित्य पेट्रोल पंपासमोर, बार्शी रोड, धाराशिव) यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शैलेंद्र यांचे वडील राजाभाऊ स्वामी यांचे बार्शी रोडवर आदित्य पेट्रोल पंपासमोर घर आहे. त्यांच्याच घरी आरोपी राजेश झोंबाडे हा भाडेकरू म्हणून राहतो. रविवारी (ता. 12) सायंकाळी 7.20 वाजण्याच्या सुमारास राजाभाऊ स्वामी यांनी भाडेकरू राजेश याला घरभाड्याची मागणी केली. याच कारणावरून त्यांच्यात वाद निर्माण झाला.

या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. संतापलेल्या राजेश झोंबाडे याने राजाभाऊ यांना आधी शिवीगाळ करत  बेदम मारहाण केली. त्यानंतर जीवे मारण्याच्या उद्देशाने त्याने जवळचा लोखंडी कोयता काढून राजाभाऊ यांच्यावर वार केले. या सशस्त्र हल्ल्यात राजाभाऊ स्वामी गंभीर जखमी झाले. तसेच, ‌‘तुला जिवंत सोडणार नाही‌’, अशी जीवे मारण्याची धमकी देऊन आरोपीने तिथून पळ काढला.

या घटनेनंतर जखमी राजाभाऊ यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर मुलगा शैलेंद्र स्वामी यांनी सोमवारी (ता. 13) दिलेल्या प्रथम खबरीवरून धाराशिव शहर पोलिस ठाण्यात आरोपी राजेश झोंबाडे याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (भा.न्या.सं.) कलम 109 (खुनाचा प्रयत्न), 352, 351(2) सह भारतीय हत्यार कायदा (शस्त्र अधिनियम) कलम 4/25 अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या गंभीर प्रकरणाचा पुढील तपास धाराशिव शहर पोलिस करत आहेत.

 
Top