भुम (प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ भूमच्या शिष्टमंडळाने तहसीलदार जयवंत पाटील यांची भेट घेतली असता तहसीलदार यांनी सर्व महिलांचे जनगणना आदेश रद्द करण्याची ग्वाही दिली.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, जनगणना करण्यासाठी प्रगनक म्हणून भूम तालुक्यातील 60 ते 65 महिला शिक्षिकांना नेमणूक देण्यात आली होती. यावेळी सर्व महिलांसह प्राथमिक शिक्षक संघाचे शिष्टमंडळाने तहसीलदार यांना भेटून महिलांचे आदेश रद्द करण्याची मागणी केली. याचा सहानुभूतीपूर्वक विचार करून आतापर्यंत 90 टक्के महिला प्रगनकांचे आदेश रद्द करण्यात आलेले आहेत. त्याबद्दल संघाचे शिष्टमंडळाने तहसीलदार यांना भेटून त्यांचे आभार मानले व उर्वरित महिला प्रगनकांचे आदेश रद्द करण्याची विनंती केली. प्रशिक्षणाची वेळ 10 ते 6.00 ऐवजी सकाळी आठ ते बारा करण्याची देखील विनंती केली. यावर तहसीलदार यांनी सकारात्मक निर्णय घेण्याची ग्वाही दिली. याबद्दल संघाचे शिष्टमंडळाने तहसीलदार यांचे आभार मानले.
यावेळी शिष्टमंडळामध्ये महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे राज्य उपाध्यक्ष सोमनाथ टकले, तालुकाध्यक्ष संजीवन तांबे, कार्याध्यक्ष दीपक वाळके, कोषाध्यक्ष दत्तात्रय घुले, प्रसिद्धीप्रमुख संदीप शिंदे, ज्ञानज्योती सावित्रीमाई फुले शिक्षक सहकारी पतसंस्थेचे चेअरमन अंगद मिसाळ, संचालक अच्युत मुळे, सुनील गुंजाळ, संतोष माळी, युवराज वरळे आणि भाऊसाहेब कोळेकर यांचे प्रामुख्याने उपस्थिती होती.
