धाराशिव (प्रतिनिधी)- एप्रिल महिना उजाडताच सुर्यनारायण आग ओकू लागला आहे. वाढत्या उन्हामुळे जलसाठ्यातील पाण्याचे बाष्पीभवनही वाढले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील उपयुक्त जलसाठ्याची टक्केवारी 37.56 टक्के इतकी झाली आहे. विशेष म्हणजे गेल्यावर्षी सप्टेंबर- ऑक्टोबरमध्ये धाराशिव जिल्ह्यात अतिवृष्टी झाली होती.
जिल्ह्याची पावसाची सरासरी 770.07 मिमी असताना जिल्ह्यात सरासरी 1294.64 इतका पाऊस झाला होता. एकूण 167.98 टक्के इतका पाऊस झाल्यामुळे जिल्ह्यातील सिंचन प्रकल्प ओव्हरफ्लो झाले होते. तर दुसरीकडे पाण्याचा वापरही वाढत आहे. परिणामी प्रकल्पात आता 373.73 दलघमी उपयुक्त पाणीसाठा आहे. यंदा अलनिनोमुळे मान्सूनमध्ये वार्षिक सरासरी इतकाच पाऊस होण्याचा अंदाज आहे. नागरिकांनी टंचाईचा सामना करावा लागू नये यासाठी प्रशासन स्तरावर पाणीसाठा आरक्षित करण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. वाढत्या उन्हामुळे बाष्पीभवनाचा वेग वाढून पाणीसाठ्यात घट होण्याची शक्यता आहे.
वाढत्या उन्हामुळे पाण्याचा वापर वाढला असून, बाष्पीभवनही होत आहे. त्यामुळे प्रकल्पातील जलसाठा दिवसेंदिवस खालावू लागला आहे. 226 प्रकल्पांपैकी 2 प्रकल्प कोरडे पडले आहेत. 14 प्रकल्प जोत्याच्या खाली आहेत. 62 प्रकल्पांमध्ये 25 टक्क्यापेक्षा कमी पाणीसाठा आहे. 125 प्रकल्पांमध्ये 26 ते 50 टक्के पाणीसाठी आहे. 20 प्रकल्पात 51 ते 75 टक्के उपयुक्त पाणी आहे. केवळ दोन प्रकल्पात 75 टकक्यापेक्षा अधिक पाणीसाठा आहे. एक प्रकल्प आजही भरलेला आहे. या प्रकल्पांमध्ये 273.73 दलघमी उपयुक्त पाणीसाठा आहे. उपयुक्त पाण्याची टक्केवारी 37.56 टक्के इतकी आहे. सध्या पाणीसाठा पुरेसा असला तरी यंदा अल निनोच्या प्रभावामुळे पाऊस कमी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे टंचाईचा सामना करावा लागू नये, यासाठी प्रशासनाकडून सप्टेंबरपर्यंत पाणीसाठा पुरेल याची खबरदारी घेतली जात आहे. पाणीसाठा आरक्षित ठेवण्यासाठी प्रशासनाकडून नियोजन केले जात आहे. र्गींवर्षीपेक्षा पाणी अधिक असले तरी नियोजनावर भर दिला जात आहे.