तुळजापूर (प्रतिनिधी)- तुळजापूर तालुक्यातील कदमवाडी येथे 6 एप्रिल रोजी आयोजित करण्यात आलेल्या घरगुती सुहासिनी जेवण कार्यक्रमानंतर तब्बल 24 जणांना अन्नातून विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.
कदमवाडी गावात एका कुटुंबात धार्मिक कार्यक्रमानिमित्त महिलांसाठी सुहासिनी जेवणाचे आयोजन करण्यात आले होते. दुपारी सुमारे 3 वाजता पारंपरिक जेवणाचा बेत ठेवण्यात आला होता. यात खीर, बेसनवडी, वरण-भात, भाकरी या पदार्थांचा समावेश होता. जेवणानंतर काही तासांतच अनेक महिलांना उलटी,मळमळ,चक्कर, जुलाब, अशी लक्षणे दिसू लागली. पहाटेपर्यंत अनेकांना समान त्रास सुरू झाल्याने गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले. 23 रुग्ण सध्या तुळजापूर उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेत आहेत. 1 वृद्ध महिला (साखराबाई लबडे, वय 80) यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी धाराशिव येथे हलविण्यात आले आहे. आरोग्य विभागाच्या माहितीनुसार सर्व रुग्णांची प्रकृती सध्या स्थिर आहे. या घटनेत महिलांसह काही लहान मुले व वृद्धांचाही समावेश असून गावातील अनेक कुटुंबांवर याचा परिणाम झाला आहे. विषबाधा नेमकी कोणत्या अन्नपदार्थामुळे झाली, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. या घटनेमुळे ग्रामीण भागातील सामूहिक जेवणांमध्ये अन्न सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. स्वच्छता, साठवण आणि अन्न बनवण्याच्या पद्धतींवर अधिक लक्ष देण्याची गरज व्यक्त होत आहे.
