धाराशिव (प्रतिनिधी)-  कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील समुद्राला वाहून जाणारे पुराचे पाणी मराठवाड्यात वळवून आणण्याच्या आपण मांडलेल्या महत्वाकांक्षी प्रकल्पाला अर्थसंकल्पातील तरतुदीमुळे आता मोठी गती मिळणार आहे. धाराशिव जिल्ह्यातील पात्र शेतकरी बांधवांनाही पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेतून 2 लाख रुपयांपर्यंत कर्जमाफीचा दिलासा मिळणार आहे. तसेच नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकरी बांधवांना 50 हजार रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान मिळणार आहे. धाराशिव-तुळजापूर-सोलापूर रेल्वेमार्गाच्या माध्यमातून पर्यटनाला उभारी देणे आणि दळणवळणाची सक्षम जाळे निर्माण करण्याचे जे ध्येय आपण ठरवले होते त्याला या अर्थसंकल्पामुळे मोठी ताकद मिळाली आहे. जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांच्या विकास कार्यक्रमाला अर्थसंकल्पातील तरतुदींमुळे आणखी मोठी गती मिळणार असल्याचा विश्वास आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी व्यक्त केला.

कृष्णा खोऱ्यातील पुराचे पाणी भीमा खोऱ्यातील पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त भागात वळवण्याचे नियोजन करण्यात आले आहे. जागतिक बँकेच्या सहाय्याने प्रस्तावित असलेल्या या प्रकल्पासाठी या अर्थसंकल्पात महत्वपूर्ण तरतूद करण्यात आली आहे. धाराशिव-तुळजापूर-सोलापूर या 84 किलोमीटर लांबीच्या रेल्वे मार्गासाठी करण्यात आलेल्या तरतुदीमुळे जिल्ह्यातील दळणवळणाचे जाळे आणखी सक्षम होणार आहे. त्यामुळे आपण पर्यटन व्यवसायाच्या माध्यमातून रोजगार निर्मितीच्या दृष्टीने डोळ्यासमोर ठेवलेले ध्येय पूर्ण करण्यासाठी आता आणखी मदत होणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी सादर केलेला हा अर्थसंकल्प धाराशिव जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्राच्या प्रगतीला नवी दिशा देणारा आहे. प्रगतीशील, शाश्वत, सर्वसमावेशक आणि सुशासन या चार स्तंभांवर आधारित हा अर्थसंकल्प जिल्हयातील शेतकरी, कष्टकरी आणि सामान्य नागरिकांचे जीवनमान उंचावणारा ठरेल, असा विश्वास आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी व्यक्त केला आहे. आमदार पाटील यांनी धाराशिव जिल्ह्याच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद फडणवीस व एकनाथराव शिंदे व सुनेत्राताई पवार या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे विशेष आभारही मानले आहेत.


 
Top