धाराशिव (प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्यातील महायुती सरकारने राज्याच्या उज्वल भविष्यासाठी दूरदृष्टीपूर्ण आज आपला अर्थसंकल्प सादर केला. हा अर्थसंकल्प शेतकरी, युवाशक्ती, नारीशक्ती आणि सर्वसामान्यांच्या जीवनाला मजबूत करणारा अर्थसंकल्प असून राज्यातील सर्व घटकांना न्याय देत पायाभूत विकास कामांना गती देत राज्याला पुढे घेऊन जाणारा हा अर्थसंकल्प आहे. अशी प्रतिक्रिया भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्य नितीन काळे यांनी दिली.
पुढे बोलताना ते म्हणाले की या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर शेतकरी कर्जमाफी योजना या योजनेअंतर्गत दोन लाख रुपयापर्यंतचे कर्ज माफ करण्याचे धोरण राज्य सरकारने आखले आहे. तसेच जे शेतकरी नियमित कर्ज फेड करतात अशा शेतकऱ्यांना 50 हजार रुपये प्रोत्साहन पर अनुदान स्वरूपात देण्याचे ठरवले आहे. शेतकऱ्यांसाठी 7.5 पर्यंतच्या कृषी पंपांना वीज सवलत देण्याची तरतूद आज राज्य सरकारने केली आहे. या शासनाच्या निर्णयामुळे सर्वसामान्य शेतकरी व शेतमजूर यांच्या जीवनामध्ये एक नवीन सोनेरी पहाट होऊन चांगले दिवस महायुतीच्या काळात आले आहेत. महायुती सरकारच्या काळात सुरू केलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना यापुढेही अखंड सुरू राहणार आहे.
या योजनेसंदर्भात विरोधकांनी कितीही समाजामध्ये भ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेला. परंतु त्यांचा हा खोटारडेपणा या अर्थसंकल्पातून महायुती सरकारने हाणून पाडला आहे. महिला, युवक,बालके, गरीब व वंचित घटकांवर लक्ष केंद्रित करून त्यांच्यासाठी अन्नसुरक्षा,निवारा, पिण्याचे शुद्ध पाणी, आरोग्य सेवा, शिक्षण सुविधा, आणि रोजगार व स्वयंरोजगार इत्यादी योजनांच्या सक्षमीकरणासाठी बळ देण्याचे काम महायुती सरकारने या अर्थसंकल्पातून केले आहे. महिला सबलीकरणासाठी राज्यातील 25 लाख महिलांना लखपती दीदी बनवण्याचे उद्दिष्ट या अर्थसंकल्पामध्ये समाविष्ट केले आहे. तसेच दिव्यांग नागरिकांसाठी 2500 रुपये मानधन देण्याची तरतूद आजच्या अर्थसंकल्पात केल्यामुळे दिव्यांग नागरिकांच्या सबलीकरणाचे काम या माध्यमातून होणार असल्याचे नितीन काळे यांनी म्हटले आहे.
राज्यातील राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनात विशेष प्राविण्य मिळणाऱ्या विद्यार्थ्यांचे मनोबल वाढविण्यासाठी महायुती सरकारने बक्षीस रकमेत मोठी वाढ केली आहे. विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची ओढ निर्माण करण्यासाठी मुख्यमंत्री विज्ञानवारी उपक्रमा अंतर्गत विद्यार्थ्यांना इस्रो आणि अमेरिकेतील नासा या जगप्रसिद्ध संस्थांना भेट देण्याची संधी उपलब्ध करून देण्याची तरतूद या अर्थसंकल्पामध्ये केली आहे. राज्यातील सर्वात मोठा घटक हा सर्वसामान्य आहे.सर्वसामान्य तरुणांसाठी महाराष्ट्र एजन्सी फॉर हॉलिस्टिक इंटरनॅशनल मोबिलिटी अँड ऍडव्हान्समेंट या संस्थेची स्थापना करून त्याच्या माध्यमातून आपल्या तरुणांना परदेशातील नोकऱ्यांसाठी आवश्यक अशा कौशल्य प्रशिक्षण आणि आर्थिक मार्गदर्शन दिले जाईल राज्यातील समुपदेशन सेवांचा विस्तार व अधिक संघटित व्यवस्था निर्माण करण्यासाठी 36 केंद्रे स्थापन करण्यात येनार आहेत.
एकूणच सर्वसामान्य जनतेच्या प्रगतीसाठी पूरक असा अर्थसंकल्प सादर केल्याबद्दल मी सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबां यांचा आभारी असून राज्यातील सर्वसामान्यांबद्दल असलेली तळमळ व प्रयत्नांची पराकाष्टा यातून दिसून येते.एकूणच हा आजचा 7.69 लाख कोटींचा अर्थसंकल्प सर्वसामान्यांच्या जिव्हाळ्याचा हिताचा अर्थसंकल्प आहे. असे मत श्री नितीन काळे यांनी बोलताना यावेळी व्यक्त केले.