कळंब (प्रतिनिधी)- कलंब पंचायत समितीच्या सभापती व उपसभापती पदाच्या निवडणुकीत अत्यंत चुरशीची लढत पाहायला मिळाली. दोन्ही बाजूंना समान मते मिळाल्याने अखेर नियमानुसार लहान मुलाच्या हस्ते चिठ्ठी काढून निर्णय घेण्यात आला आणि त्यातून महायुतीला यश मिळाले.

सभापती पदासाठी शिवसेनेच्या राजश्री धनंजय वरपे तर उबाठा गटाच्या सीमा टेकाळे यांनी उमेदवारी दाखल केली होती. तसेच उपसभापती पदासाठी भाजपच्या प्रणीता प्रणव चव्हाण आणि उबाठा गटाचे मनोज घोगरे यांच्यात सामना झाला. पंचायत समितीत दोन्ही गटांकडे प्रत्येकी आठ सदस्य असल्याने मतदान घेण्यात आले. मात्र मतदानानंतरही दोन्ही बाजूंना समान मते मिळाल्याने चिठ्ठीद्वारे निर्णय घेण्यात आला. या प्रक्रियेत राजश्री धनंजय वरपे यांची सभापती म्हणून तर प्रणीता प्रणव चव्हाण यांची उपसभापती म्हणून निवड निश्चित झाली.

निकाल जाहीर होताच शिवसेना-भाजप महायुतीच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला. यावेळी शिवसेना धाराशिव जिल्हाप्रमुख अजित पिंगळे यांनी कार्यकर्त्यांचे अभिनंदन करत हा विजय महायुतीच्या एकजुटीचा आणि जनतेच्या विश्वासाचा विजय असल्याचे सांगितले. या प्रसंगी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शिवाजी कापसे, शिवसेना तालुकाप्रमुख लक्ष्मीकांत हुलजुते, उपजिल्हाप्रमुख अनंत वाघमारे, भाजप तालुकाध्यक्ष अरुण चौधरी, दत्तात्रय साळुंखे, जिल्हा परिषद सदस्य अनंत लंगडे, प्रणव चव्हाण, मेघराज देशमुख यांच्यासह महायुतीचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. नवनिर्वाचित सभापती व उपसभापती यांनी कलंब तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी प्रामाणिकपणे काम करण्याचा निर्धार केला.


 
Top