धाराशिव (प्रतिनिधी)- विविध योजनांची अंमलबजावणी करणे हे कठीण व जिकरीची काम आहे. शासनाच्या विविध कल्याणकारी योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचल्या नाही,तर त्या कागदावरच राहतात.या महाशिबिराच्या माध्यमातून विविध योजना ह्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचाव्यात.असे प्रतिपादन मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठाचे न्यायमूर्ती तथा पालक न्यायमूर्ती शैलेश ब्रम्हे यांनी केले.
जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा परिषद,धाराशिव यांच्या संयुक्त विद्यमाने आज 1 मार्च रोजी धाराशिव येथील लेडीज क्लब येथे आयोजित विधी सेवा महाशिबिर व शासकीय योजनांच्या महामेळाव्याचे उद्घाटन न्यायमूर्ती ब्रम्हे यांच्या हस्ते करण्यात आले. या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात न्यायमूर्ती ब्रम्हे बोलत होते. अध्यक्षस्थानी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्या अध्यक्षा न्यायाधीश अभिश्री देव, प्रमुख अतिथी म्हणून जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मैनाक घोष,पोलिस अधीक्षक रितू खोखर,जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्या सचिव न्यायाधीश भाग्यश्री पाटील व जिल्हा विधिज्ञ मंडळाचे अध्यक्ष ॲड.अमोल वरुडकर यांची उपस्थिती होती.
जिल्हाधिकारी पुजार यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की,नागरिकांना मोफत कायदेशीर मार्गदर्शन वेळोवेळी करण्यात येते.शासनाच्या अनेक योजना आहेत.त्या लोकांपर्यंत पोहचविणे व त्यांना योजनांचा लाभ मिळवून देणे हे आपले कर्तव्य आहे. न्यायाधीश देव म्हणाल्या की,हा लोकशाहीचा उत्सव आहे.या उत्सवाच्या माध्यमातून विधी सेवा आणि शासनाच्या कल्याणकारी योजनांची माहिती लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यात येत आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश अभिश्री देव यांनी केले. संचालन न्यायाधीश सचिन पाटील यांनी केले. आभार जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्या सचिव न्यायाधीश भाग्यश्री पाटील यांनी मानले.
