भूम (प्रतिनिधी)- आजच्या काळात महिला शिक्षण, नोकरी, व्यवसाय, राजकारण, प्रशासन अशा विविध क्षेत्रांत मोठ्या प्रमाणात कार्यरत आहेत. मात्र प्रगतीसोबतच त्यांच्यासमोर अनेक सामाजिक, मानसिक आणि कौटुंबिक आव्हानेही उभी राहतात. महिलांनी आत्मविश्वास, शिक्षण आणि स्वावलंबनाच्या बळावर ही आव्हाने पेलून समाजात आपले स्वतंत्र स्थान निर्माण करावे, असे प्रतिपादन डॉ. ज्योती मांडोत यांनी केले.
शंकरराव पाटील महाविद्यालय भूम येथे महिला कक्ष, राष्ट्रीय सेवा योजना व आयक्यूएसी यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनानिमित्त “आधुनिक महिला पुढील आव्हाने” या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात डॉ. ज्योती मांडोत यांनी प्रमुख वक्त्या म्हणून बोलत होत्या.
या कार्यक्रमाला शंकरराव पाटील कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संतोष शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती. तर शंकरराव पाटील महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. अनुराधा जगदाळे यांनी अध्यक्षस्थान भूषविले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. शीतल अलगुंडे यांनी केले. तर कार्यक्रमाच्या शेवटी प्रा. दीप्ती गिरी यांनी उपस्थित मान्यवर व विद्यार्थिनींचे आभार मानले. या कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्यापक, कर्मचारी तसेच विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
