धाराशिव (प्रतिनिधी)- राज्य शासनाच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान टप्पा क्रमांक 1 चे आयोजन करण्यात आले आहे. हे एक दिवशीय अभियान दि.7 मार्च ते 11 मे दरम्यान राबविण्यात येत असून नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा. असे उपविभागीय अधिकारी ओंकार देशमुख यांनी दि.5 मार्च रोजी केले.
धाराशिव तहसील कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी नायब तहसिलदार विशाखा बलकवडे व महादेव शिंदे आदी उपस्थित होते. पुढे बोलताना देशमुख म्हणाले की, या अभियानाअंतर्गत एक दिवशीय सेवेद्वारे जिवंत 7/12 अंतर्गत 7/12 वाचन, सामाजिक अर्थसाह्य योजनांसाठी पात्र लाभार्थ्याची अर्ज स्वीकारणे, मंजूर फेरफार प्रकरणातील 7/12, फेरफार उतारा व खाते उतारा वाटप, डिजिटल 7/12 ला कायदेशीर वैधताबाबत जनजागृती करणे, भोगवटदार वर्ग 2 जमिनी भोगवटदार 1 मध्ये परावर्तित करणे, तुकडे बंदी कायदा विरुद्ध दि.15/11/1965 ते 15/11/2014 पर्यंत प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा कमी क्षेत्रांच्या जमिनीचे खरेदी विक्री व्यवहार नियमानुकूल करणे, आकर्षक तरतुदी संदर्भातील सुधारणाबाबत मार्गदर्शन करणे आदी सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. त्यामुळे धाराशिव व तुळजापूर तालुक्यातील सर्व ग्रामस्थ शेतकरी विद्यार्थी व नागरिकांनी आवश्यक कागदपत्रासह संबंधित ठिकाणी उपस्थित राहून या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन देशमुख यांनी केले आहे.
या तारखेला मंडळनिहाय होणार शिबीर
केशेगांव 7 मार्च, बेंबळी 11 मार्च, तेर 14 मार्च, करजखेडा 17 मार्च, ढोकी 18 मार्च, येडशी 25 मार्च, अंबेजवळगा 8 एप्रिल, जागजी 10 एप्रिल, पाडोळी 17 एप्रिल धाराशिव ग्रामीण 8 मे आणि धाराशिव शहर 15 मे रोजी शिबिराचे आयोजन होणार आहे.
