धाराशिव (प्रतिनिधी)- स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने धाराशिव जिल्ह्यात मिळवलेले यश हे केवळ राजकीय नसून, तो जनतेने सकारात्मक कामाला दिलेला कौल आहे. या ऐतिहासिक विजयाचा आनंद साजरा करताना उत्सवाला सेवेची जोड देत, यापुढे कोणाचाही सत्कार हार, तुरे किंवा शाल देऊन न करता, शालेय साहित्य देऊन करावा, असे आवाहन जिल्ह्याचे नेते तथा भाजपा आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी केले आहे.
नुकत्याच पार पडलेल्या नगर परिषद निवडणुकीनंतर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीतही भाजपाने जिल्ह्यात दैदिप्यमान यश संपादन केले आहे. नवनिर्वाचित जिल्हा परिषद अध्यक्ष सौ. अर्चना पाटील यांच्यासह सर्व विजयी सदस्यांचे आणि सभापतींचे जिल्ह्यात जंगी स्वागत होत आहे. हा उत्साह साजरा करताना सामाजिक बांधिलकीही जपली जावी. या उदात्त हेतूने आमदार पाटील यांनी अभिनव आवाहन केले आहे. आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी कार्यकर्त्यांना आवाहन करताना सत्काराचे स्वरूप बदलून त्यात शालेय साहित्याला प्राधान्य द्यावे असे म्हटले आहे. यापुढे पक्षाच्या कोणत्याही विजयी पदाधिकारी किंवा नेत्याचा सत्कार करताना हार, तुरे, फेटे, बुके किंवा महागड्या शालींचा वापर करू नये. सत्कारासाठी खर्च होणाऱ्या रकमेतून वही, पेन, दप्तर किंवा इतर शालेय साहित्य भेट म्हणून द्यावे. जमा झालेले हे सर्व शालेय साहित्य जिल्हा परिषद आणि नगर परिषदेच्या शिक्षण विभागामार्फत जिल्ह्यातील गरजू आणि होतकरू विद्यार्थी-विद्यार्थिनींना वितरित केले जाईल.
महायुतीमधील एकमत
महायुतीमधील काही सहकारी बांधवांशी याबाबत चर्चा केली आहे. भाजपाने सामाजिक बांधिलकीच्या दृष्टीने सुरू केलेल्या महत्त्वपूर्ण उपक्रमात महायुतीतील घटक पक्षातील सहकारी बांधवही उत्स्फूर्तपणे सहभागी होतील. असा विश्वास आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी व्यक्त केला आहे.
