धाराशिव (प्रतिनिधी)-  सोयाबीन विकल्यानंतर व्यवहारादरम्यान चुकून भलत्याच व्यक्तीच्या खात्यात जमा झालेले 1 लाख 54 हजार रुपये परत मिळवून देण्यात धाराशिवच्या सायबर पोलिसांना मोठे यश आले आहे. पोलिसांच्या तत्परतेमुळे आणि योग्य कायदेशीर पाठपुराव्यामुळे तब्बल तीन महिन्यांनंतर ही रक्कम तक्रारदार महिलेला परत मिळाली आहे. त्याबद्दल सायबर विभागाच्या कामाचे कौतुक करण्यात येत आहे. 

किणी (ता. जि. धाराशिव) येथील रहिवासी पूनम दीपक दंडनाईक यांनी 5 डिसेंबर 2025 रोजी धाराशिव येथील अडत बाजारात आपले सोयाबीन विकले होते. यावेळी पैशांचा ऑनलाइन व्यवहार करताना त्यांच्याकडून चुकून भलत्याच ‌‘स्कॅनर‌’वर  1 लाख 54 हजार रुपये पाठवले गेले. ही चूक लक्षात आल्यावर पूनम यांनी त्या अज्ञात नंबरवर संपर्क करून पैसे परत करण्याची विनंती केली. मात्र, समोरच्या व्यक्तीने पैसे परत करण्यास स्पष्ट नकार दिला. पैसे बुडाल्याची भीती निर्माण झाल्याने पूनम यांनी तात्काळ तक्रार दाखल केली. या तक्रारीची धाराशिव सायबर पोलिसांनी गंभीर दखल घेतली. पोलिसांनी तातडीने संबंधित बँकेशी पत्रव्यवहार करून अज्ञात व्यक्तीच्या खात्याची माहिती मिळवली. तक्रार वेळेत प्राप्त झाल्याने पोलिसांनी वेगाने चक्रे फिरवत त्या अज्ञात खात्यावरील रक्कम तत्काळ ‌‘फ्रीझ केली.

रक्कम फ्रीझ झाल्यानंतर ती पुन्हा तक्रारदाराच्या खात्यात वळती करण्यासाठी बँकेने न्यायालयाच्या आदेशाची मागणी केली. यावर सायबर पोलिसांनी योग्य ती कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून न्यायालयाचा आदेश बँकेला सादर केला. या सर्व प्रक्रियेनंतर अखेर मंगळवारी (ता. 17 मार्च 2026) पूनम दंडनाईक यांना त्यांचे हक्काचे 1 लाख 54 हजार रुपये परत मिळाले. आपली कष्टाची रक्कम परत मिळाल्याने त्यांनी सायबर पोलिसांचे विशेष आभार मानले. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक रितु खोखर व अपर पोलीस अधीक्षक  शफकत आमना यांचे मार्गदर्शनाखाली सायबर पोस्टेचे पोलिस निरीक्षक शकील शेख, पोशि गाडे, पोशि सुर्यवंशी यांनी  केला आहे.


 
Top