भुम (प्रतिनिधी)-  विज्ञानाचा प्रचार आणि प्रसार करत विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविणाऱ्या धाराशिव जिल्ह्यातील उत्कृष्ट शिक्षकांना दिला जाणारा प्रतिष्ठेचा सन 2025-26 चा सी. व्ही. रमण जिल्हास्तरीय विज्ञान शिक्षक पुरस्कार वाशी येथील जे. आय. आर. टी. तंत्र प्रशालेच्या सहशिक्षिका पुनम गौतम चेडे यांना जाहीर झाला आहे. वाशी तालुक्यातून हा बहुमान पटकावल्याबद्दल त्यांच्यावर सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

जिल्हा विज्ञान अध्यापक मंडळातर्फे सन 2024-25 पासून हा सी. व्ही. रमण विज्ञान शिक्षक पुरस्कार उपक्रम राबविला जात आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञान या विषयांमध्ये भरीव योगदान देणे, सामाजिक कार्यात सहभाग, तसेच शाळेतील विविध उपक्रम व स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विज्ञान शिक्षकांना या पुरस्काराने गौरविण्यात येते. या सर्व निकषांवर उत्तम कामगिरी बजावत पुनम चेडे यांनी यावर्षीच्या पुरस्कारावर आपली मोहोर उमटवली.

जिल्हा विज्ञान अध्यापक मंडळाचे जिल्हाध्यक्ष स्वामी यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. या यशाबद्दल स्वामी यांनी पुनम चेडे यांना विशेष शुभेच्छा देऊन पुढील वाटचालीस प्रेरणा दिली आहे. तसेच हा पुरस्कार प्राप्त करण्यासाठी जिल्हा विज्ञान अध्यापक मंडळाचे तालुकाध्यक्ष सुनील क्षीरसागर यांचे योग्य मार्गदर्शन व पाठपुरावा लाभला.  पुनम चेडे यांच्या या गौरवाबद्दल संस्थेचे पदाधिकारी, प्रशालेचे मुख्याध्यापक आणि सर्व कर्मचारी वृंदाकडून त्यांचे हार्दिक अभिनंदन करण्यात आले आहे. 

 
Top