तुळजापूर (प्रतिनिधी)-   तामलवाडी पोलीस ठाणे हद्दीत घडलेल्या 13 महिन्यांच्या चिमुकलीच्या निर्घृण खुनाच्या घटनेने परिसर हादरला आहे. विशेष म्हणजे, हा अमानुष प्रकार तिच्याच चुलत्याने केल्याचे उघडकीस आले असून तामलवाडी पोलिसांनी अवघ्या 24 तासांत गुन्ह्याचा छडा लावला आहे. दि.28 फेब्रुवारी 2026 रोजी महादेव माने (रा. गवळेवाडी) यांनी आपल्या 13 महिन्यांच्या मुलीला अज्ञात व्यक्तीने घरातून पळवून नेल्याची तक्रार तामलवाडी पोलीस ठाण्यात दिली होती. अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. सहायक पोलीस निरीक्षक गोकुळ ठाकूर यांनी तपासाची सूत्रे हाती घेताच गुप्त बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पीडित मुलीचा चुलता शंकरेश्वर माने याच्यावर संशय बळावला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली.

आरोपीने 27 फेब्रुवारी रोजी पहाटे सुमारे 5 ते 5.30 वाजण्याच्या सुमारास चिमुकलीला घरातून उचलून नेले. शेतात नेऊन तिचा गळा दाबून खून केल्यानंतर कोयत्याने मृतदेहाचे तुकडे करून पोत्यात भरले व जवळील चारीमध्ये पुरून टाकल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. आरोपीच्या कबुलीनंतर दोन पंचांच्या उपस्थितीत पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेण्यात आला.प्राथमिक तपासात कौटुंबिक वादातून हा प्रकार घडल्याचे निष्पन्न झाले आहे. आरोपीच्या भावाची पत्नी परपुरुषासोबत पळून गेल्याच्या कारणावरून त्याच्या मनात तीव्र संताप होता. तसेच, पीडित मुलगी आपल्या भावाची नसल्याचा संशय आल्याने रागाच्या भरात त्याने हे कृत्य केल्याची माहिती पोलिसांनी दिली. 

या गुन्ह्याचा तपास जिल्हा पोलीस अधीक्षक रितू खोकर, अप्पर पोलीस अधीक्षक शाफाकत आमना यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आला. सहायक पोलीस निरीक्षक गोकुळ ठाकूर, पोलीस हवालदार जुबेर काझी, आकाश सुरनर, नितीन भोसले, सूरज नरवडे, नझीर बागवान, उमेश माने, तुराब शेख व मनोज गोबाडे यांच्या पथकाने अवघ्या 24 तासांत गुन्ह्याचा उलगडा केला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून आरोपीविरुद्ध पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.

 
Top