भूम (प्रतिनिधी)- भूम नगर परिषदेत प्रभारी मुख्याधिकारी कार्यालयात नियमित उपस्थित राहत नसल्याच्या निषेधार्थ जनशक्ती शहर विकास आघाडीच्या नगरसेवकांनी मंगळवारी अनोखे आंदोलन करत मुख्याधिकाऱ्यांच्या खुर्चीवर बेशरमचे झाड ठेवून निषेध नोंदविला.

दुपारी सुमारे 12.30 वाजता उपनगराध्यक्ष लक्ष्मी साठे, गटनेते रुपेश आप्पा शेंडगे, बांधकाम सभापती अनिल शेंडगे, नियोजन सभापती रामराजे कुंभार यांच्यासह आघाडीच्या 14 नगरसेवकांनी नगर परिषद कार्यालयात आंदोलन केले. सध्या नायब तहसीलदार प्रवीण जाधव यांच्याकडे प्रभारी मुख्याधिकाऱ्यांचा कार्यभार आहे. मात्र ते तहसील कार्यालयात बसूनच कामकाज पाहत असल्याने नगर परिषदेत येत नसल्याचा आरोप नगरसेवकांनी केला.

यामुळे नागरिकांची नावनोंदणी, जन्म-मृत्यू दाखले, घरकुल योजना यांसारखी महत्त्वाची कामे रखडल्याचे नगरसेवकांनी सांगितले. मंगळवार व बुधवार या दिवशी नगर परिषदेत उपस्थित राहून कामकाज पाहावे, अशी विनंती करूनही मुख्याधिकारी उपस्थित राहत नसल्याने अखेर नगरसेवकांनी त्यांच्या कार्यालयातील खुर्चीवर बेशरमचे झाड ठेवून निषेध व्यक्त केला. यावेळी निषेधाच्या घोषणाही देण्यात आल्या.

यावेळी बोलताना गटनेते रुपेश शेंडगे म्हणाले की, मुख्याधिकाऱ्यांनी नगर परिषदेत नियमित उपस्थित राहून नागरिकांची कामे वेळेत करावीत व शहरातील समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करावेत, अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल. या आंदोलनात जनशक्ती शहर विकास आघाडीचे 14 नगरसेवक उपस्थित होते. या घटनेची शहरात दिवसभर चर्चा रंगली होती.


Next
This is the most recent post.
Previous
Older Post
 
Top