धाराशिव (प्रतिनिधी)-  धाराशिव जिल्ह्यातील बांधकाम कामगार योजनांमधील कोट्यवधींच्या कथित भ्रष्टाचाराचा मुद्दा अखेर राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात गाजला असून, आमदार सुरेश धस यांनी विधानसभेत केलेल्या गौप्यस्फोटामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे, धाराशिवमधील एका माजी नगराध्यक्षाची बांधकाम मजूर म्हणून नोंद झाल्याचा धक्कादायक खुलासा त्यांनी सभागृहात केल्याने “तो माजी नगराध्यक्ष कोण?” याची जोरदार चर्चा शहरात सुरू झाली आहे.

बांधकाम कामगार विभागातील गैरव्यवहार, दलालांचा सुळसुळाट आणि बोगस नोंदींचा प्रकार उघडकीस आणत सातत्याने माध्यमांनी वृत्तांकन केले होते. या वृत्तांची दखल घेत आमदार धस यांनी हा मुद्दा लक्षवेधीद्वारे विधानसभेत मांडला. त्यांनी सादर केलेल्या माहितीनुसार, अनेक ठिकाणी प्रत्यक्षात बांधकामाशी संबंध नसलेल्या व्यक्तींची कामगार म्हणून नोंदणी करण्यात आली असून त्यांच्या नावावर शासनाच्या विविध योजनांचा लाभ लाटण्यात आला आहे. यापेक्षाही धक्कादायक बाब म्हणजे काही ठिकाणी मयत व्यक्तींनाही जिवंत दाखवून त्यांच्या नावावर कामगार नोंदणी करण्यात आली आणि योजनांचा लाभ घेतल्यानंतर पुन्हा त्यांना “मृत” दाखविण्यात आल्याचे प्रकार समोर आले आहेत. या सर्व प्रकारामध्ये दलाल, काही अधिकारी आणि मध्यस्थ यांची संगनमताने भूमिका असल्याचा गंभीर आरोप सभागृहात करण्यात आला.


मंत्र्यांचे उत्तर 

या प्रकरणावर उत्तर देताना कामगार मंत्री ॲड. आकाश पांडुरंग फुंडकर यांनीही बोगस नोंदी झाल्याची कबुली देत संपूर्ण प्रकरणाची सचिव दर्जाच्या अधिकाऱ्यामार्फत सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले. तसेच दोषींवर गुन्हे दाखल करून कठोर कारवाई केली जाईल, असे स्पष्ट आश्वासन त्यांनी दिले. “या प्रकरणात कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही,” असा इशाराही त्यांनी दिला. धाराशिव जिल्ह्यात सुमारे 31 हजार बांधकाम कामगारांची नोंदणी असून, या माध्यमातून शैक्षणिक मदत, संसारोपयोगी साहित्य, विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, विमा व इतर अनेक योजनांचा लाभ दिला जातो. मात्र, या योजनांमध्येच मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार झाल्याचे उघड झाल्याने खऱ्या लाभार्थ्यांवर अन्याय होत असल्याची भावना कामगारांमध्ये व्यक्त होत आहे.

 
Top