धाराशिव (प्रतिनिधी)- जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची निवडणूक जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक 13 मार्च रोजी दुपारी 2 वाजता कै. यशवंतराव चव्हाण सभागृहात होणार आहे.
जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाच्या निवडणूकीचा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. दिनांक 13 मार्च रोजी सकाळी 10 ते 12 वाजेपर्यंत अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठी नामनिर्देशनपत्र स्विकारणे, दुपारी 2 वाजता सभेस सुरुवात करणे,ही सभा खालीलप्रमाणे पार पडेल, दुपारी 2 ते 2.15 वाजता अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठी प्राप्त नामनिर्देशन पत्राची तपासणी,नामनिर्देशन पत्राची छाननी, दुपारी 2.15 वाजता वैधरित्या नामनिर्दिष्ट उमेदवाराची नावे वाचून दाखवणे,दुपारी 2.15 ते 2.30 वाजता उमेदवारी परत घेणे, दुपारी 2.35 वाजता उमेदवारी परत घेतलेल्या उमेदवाराची नावे वाचून दाखवणे, दुपारी 2.40 वाजता निवडणूक लढविणाऱ्या उमेदवाराची नावे वाचून दाखवणे,दुपारी 2.40 ते कामकाज संपेपर्यंत आवश्यक असल्यास मतदान प्रथम अध्यक्ष पदासाठी व नंतर उपाध्यक्ष पदासाठी होणार आहे.त्यानंतर निवडणुकीचा निकाल जाहीर करण्यात येईल.
अध्यक्षपदासाठी भाजप इच्छुक
महायुतीमध्ये ज्या पक्षाचे जिल्हा परिषद सदस्य जास्त निवडून आलेत त्या पक्षाचा अध्यक्ष याप्रमाणे राजकीय गणित ठरले आहे. भाजपचे 19 सदस्य व 1 अपक्ष असे 20 सदस्य आहेत. त्यामुळे भाजपच्या अर्चना पाटील जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी अग्रेसर आहेत. शिवसेना शिंदे गटाचे 15 जि. प. सदस्य असून, त्यांना उपाध्यक्षपद दिले जाणार असल्याचे सांगण्यात आले. अजित पवार राष्ट्रवादीचे 6 सदस्य असल्यामुळे त्यांना विषय समितीचे सभापतीपद देणार असल्याचे सांगण्यात आले. महायुतीमध्ये याप्रमाणे गणित असले तरी शिंदे सेनेचे आमदार तानाजी सावंत व पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्यात एकमत झाले तरच महायुती कायम राहिली. नाहीतर महाविकास आघाडीचे सहकार्य घेवून काही राजकीय गणिते बिघडतात का याची पण चाचपणी होण्याची शक्यता आहे.
