धाराशिव (प्रतिनिधी)-  शिक्षण घेतानाच उद्योगातील कौशल्य आत्मसात करावे असे आवाहन उद्योजक संजय देशमाने यांनी केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उप परिसर धाराशिव येथे व्यवस्थापन शास्त्र विभाग यांच्या वतीने पी. एम. उषा अंतर्गत उद्योगातील आणि शिक्षण क्षेत्रातील अंतर कमी कसे करता येईल आणि विद्यार्थ्यांना उद्योगासाठी तयार करताना आवश्यक कौशल्य मिळण्यासाठी राष्ट्रीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. 

सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष उप परिसर संचालक डॉ. रमेश चौगुले होते. व्यवस्थापन शास्त्र विभागाचे संचालक डॉ. सुयोग अमृतराव यांनी विभागाचा प्रवास आणि भविष्यातील व्हिजन मांडले. कार्यशाळा समन्वयक डॉ. सचिन बस्सैये आणि डॉ. विक्रम शिंदे उपस्थित होते. प्रथम सत्रात नांदेड येथील डॉ. सचिन पवार यांनी उद्योगातील कौशल्य यावरती मार्गदर्शन केले. द्वितीय सत्रात धनंजय गोडबोले यांनी गुंतवणूक क्षेत्रातील संधी बाबत मार्गदर्शन केले. तृतीय सत्रात एम. आय. टी. विद्यापीठातील डॉ. स्नेहल गोडबोले यांनी उद्योगातील मनुष्यबळ विकास आणि नवीन ट्रेंड बद्दल मार्गदर्शन केले. समारोपाला सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात आले. सदर कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी विभागातील शिक्षक प्रा. शीतलनाथ एखंडे, प्रा. शरद सावंत, प्रा. भाग्यश्री कुलकर्णी, प्रा. पुजा होणाळकर, विभागातील शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी यांनी परिश्रम घेतले. सदर कार्यशाळा ही विद्यापीठाचे मा. कुलगुरू प्रा. डॉ. विजय फुलारी, प्र कुलगुरू प्रा. डॉ. वाल्मीक सरवदे, कुलसचिव प्रा. डॉ. प्रशांत अमृतकर, अधिष्ठाता प्रा. डॉ. विना हुंबे, संचालक प्रा. डॉ. अभिजित शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आली.

 
Top