भूम,(प्रतिनिधी)- आंतरराष्ट्रीय स्तरावर सुरू असलेल्या इराण-अमेरिका तणावाच्या पार्श्वभूमीवर निर्यात व बाजारपेठेवर परिणाम होत आहे. त्याचप्रमाणे सध्या अवकाळी पाऊस, वादळी वारा यांचा फटका पिकाला बसत आहे. आधीच उत्पादन खर्च वाढलेला असताना केळीचे बाजारभाव मोठ्या प्रमाणात कोसळल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत.
गोरमाळा (ता. भूम, जि. धाराशिव) येथील शेतकरी शंकर राजेंद्र औताडे यांनी गट क्रमांक 60 मध्ये दोन एकर क्षेत्रावर सुमारे 2300 केळीची झाडे लावली होती. या लागवडीसाठी त्यांना सुमारे 2 लाख 50 हजार रुपयांचा खर्च आला होता. उत्पादनातून 7 ते 8 लाख रुपये उत्पन्न अपेक्षित होते. केळी हार्वेस्टिंगसाठी तयार झाली असून, यापूर्वी 10 टन केळी 15 रुपये दराने विक्रीस दिली होती. मात्र, दि. 27 मार्च 2026 रोजी सायंकाळी झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसामुळे बागेतील सुमारे 60 ते 70 टक्के नुकसान झाले. यामुळे अपेक्षित उत्पादन घटले असून सुमारे 5 लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.
दरम्यान, बाजारात केळीचे दर मोठ्या प्रमाणात घसरले असून पूर्वी 15 रुपये मिळणाऱ्या केळीला आता केवळ 3 ते 4 रुपये दराने व्यापारी मागणी करत आहेत. तसेच सध्याच्या परिस्थितीत अनेक व्यापारी थेट बागेत येऊन खरेदी करण्यासही टाळाटाळ करत असल्याने शेतकरी दुहेरी संकटात सापडले आहेत.
या पार्श्वभूमीवर प्रशासनाने तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश द्यावेत तसेच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना योग्य ती आर्थिक मदत व भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी शंकर औताडे यांनी तमाम शेतकऱ्यांच्या वतीने केली आहे.
