धाराशिव (प्रतिनिधी)- चेन्नई-सुरत ग्रीन फील्ड महामार्गासाठी धाराशिव जिल्ह्यातील अनेक गावांतील शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करण्यात येत आहेत. मात्र या जमिनींसाठी जाहीर करण्यात आलेला मोबदला अत्यल्प व अन्यायकारक असल्याची तीव्र भावना शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे. सध्याच्या बाजारभावाच्या तुलनेत प्रशासनाने निश्चित केलेले दर समाधानकारक नसल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत असल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार)चे जिल्हाध्यक्ष डॉ. प्रतापसिंह वेदप्रकाश पाटील यांनी व्यक्त केले आहे.
डॉ. पाटील यांनी सांगितले की, महामार्गाच्या कामासाठी संपादित होणाऱ्या अनेक जमिनी बागायती स्वरूपाच्या असून त्या ठिकाणी ऊस, फळबागा तसेच इतर कायमस्वरूपी पिके आहेत. मात्र जमिनीचा दर्जा, पिकांची किंमत आणि भविष्यातील उत्पादनक्षमतेचा योग्य विचार न करता मोबदला निश्चित करण्यात आल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनींच्या खरी किंमतीपेक्षा कमी मोबदला मिळत असल्याची नाराजी व्यक्त केली जात आहे.
तसेच महामार्गामुळे अनेक शेतजमिनी दोन्ही बाजूंनी विभागल्या जाणार असून, त्यामुळे शेती करणे अधिक कठीण होणार आहे. काही ठिकाणी शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी रस्ते, पाणीपुरवठा आणि इतर मूलभूत सोयींची समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या सर्व बाबींचा विचार करून संबंधित शेतकऱ्यांना योग्य दरासह वाढीव मोबदला देणे, तसेच पुनर्वसन व आवश्यक सोयी-सुविधा उपलब्ध करून देणे अत्यावश्यक असल्याचे डॉ. पाटील यांनी नमूद केले. या संदर्भात डॉ. प्रतापसिंह वेदप्रकाश पाटील यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देऊन या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेण्याची मागणी केली आहे. संबंधित विभागाशी समन्वय साधून शेतकऱ्यांना न्याय्य व वाढीव मोबदला मिळावा यासाठी तात्काळ कार्यवाही करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
