भूम (प्रतिनिधी)-  भूम तालुक्यातील ग्रामीण भागातील नागरिकांचे महसूल, जमीन व विविध शासकीय योजनांशी संबंधित प्रश्न गावपातळीवरच सोडविण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासन यांच्या महसूल व वन विभागामार्फत “छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर” अभियान राबविण्यात येत आहे. अभियानाच्या टप्पा क्रमांक 1 अंतर्गत भूम तालुक्यात दि. 7 मार्च ते 15 मे 2026 या कालावधीत विविध मंडळ स्तरावर समाधान शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती उपविभागीय अधिकारी रेवैयाह डोंगरे यांनी दिली. 

शासनाच्या “जनतेच्या दारी प्रशासन” या संकल्पनेनुसार नागरिकांना महसूल कार्यालयात वारंवार हेलपाटे मारावे लागू नयेत तसेच प्रलंबित प्रकरणांचा जलद निपटारा व्हावा, यासाठी हे विशेष अभियान राबविण्यात येत असल्याची माहिती प्रशासनाने दिली. मंडळनिहाय शिबिरांचे वेळापत्रक माणकेश्वर मंडळ 7 मार्च, पाथरूड मंडळ  14 मार्च, वालवड मंडळ 10 एप्रिल, आंबी मंडळ 17 एप्रिल, ईट मंडळ 24 एप्रिल, भूम मंडळ 8 मे, आष्टा मंडळ 15 मे या शिबिरांमध्ये महसूल विभागासह कृषी व इतर संबंधित शासकीय विभागांच्या सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

या शिबिरात महसूल, कृषी, विविध योजना आदीबाबतच्या समस्येचे समाधान केले जाणार आहे. पत्रकार परिषदेस तहसीलदार जयवंत पाटील यांनी नागरिकांनी आपल्या मंडळासाठी निश्चित केलेल्या तारखेला आयोजित समाधान शिबिरात उपस्थित राहून विविध शासकीय योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले. यावेळी परंडा तहसीलदार निलेश काकडे, नायब तहसीलदार प्रवीण जाधव यांच्यासह महसूल विभागाचे अधिकारी उपस्थित होते. हे अभियान ग्रामीण नागरिकांसाठी प्रशासनाशी थेट संवाद साधण्याची व प्रलंबित कामे जलद मार्गी लावण्याची महत्त्वपूर्ण संधी ठरणार असल्याचे सांगण्यात आले आहे.


 
Top