धाराशिव (प्रतिनिधी)- स्वतःचे पक्षप्रमुख राज्याचे मुख्यमंत्री होते. त्यावेळी रेल्वेमार्गाच्या कामात असंख्य अडथळे आणले, आणि आता काम प्रगतीपथावर असताना लोकसभेत मागणीचे नाटक करून त्याचे श्रेय लाटण्यासाठी खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांचा हा केविलवाणा स्टंट आहे. अगोदर रेल्वेमार्गाच्या कामात खोडा अन् आता श्रेयासाठी केविलवाणा प्रयत्न अशा शब्दांत भाजपचे जिल्हा प्रवक्ते ॲड. नितीन भोसले यांनी खासदारांच्या दुटप्पी भूमिकेचा पंचनामा करीत सडकून टीका केली आहे. वरातीमागून घोडे दामटणाऱ्या खासदारांनी जनतेची दिशाभूल थांबवावी, असा इशाराही त्यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिला आहे.
ॲड भोसले यांनी थेट वार करताना म्हटले की, सोलापूर-तुळजापूर-धाराशिव या महत्त्वाकांक्षी रेल्वे प्रकल्पासाठी केंद्र आणि राज्य सरकारचा प्रत्येकी 50 टक्के वाटा निश्चित झाला होता. मात्र, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी राज्याच्या हिश्याची रक्कम देण्यास स्पष्ट नकार दिला. त्यावेळी खासदारांनी आपल्या पक्षप्रमुखांकडे पाठपुरावा का केला नाही? असा खोचक सवाल भोसले यांनी उपस्थित केला आहे. ठाकरेंच्या या आडमुठ्या धोरणामुळेच प्रकल्पाची किंमत तब्बल दोन हजार कोटी रुपयांनी वाढली आणि कामाला विलंब झाला, असा गंभीर आरोपही त्यांनी त्यांनी केला आहे.
कुलस्वामिनी तुळजाभवानी मातेचे तीर्थक्षेत्र रेल्वेच्या राष्ट्रीय नकाशावर यावे यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेबांनी हा प्रकल्प जाहीर केला. या रेल्वेमार्गासाठी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी सातत्याने संघर्ष केला आहे. तत्कालीन परिवहनमंत्री अनिल परब यांनी विधानसभेत दिशाभूल करणारी माहिती दिल्यावर आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी त्यांच्यावर हक्कभंग दाखल केला होता. राज्यात महायुतीचे सरकार येताच आमदार पाटील यांनी तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा करून राज्याच्या वाट्याची रक्कम मंजूर करून घेतली.
आज धाराशिव-तुळजापूर या पहिल्या टप्प्याचे काम प्रगतीपथावर आहे. लवकरच इंजिन ट्रायल होईल. आई तुळजाभवानी मातेच्या चरणी तुळजाभवानी एक्सप्रेस धावत येईल. ठाकरे सरकारच्या काळात राज्याचा वाटा मिळाला असता तर एव्हाना हा प्रकल्प पूर्णही झाला असता. महायुती सरकारच्या इच्छाशक्तीमुळेच आज प्रकल्प प्रगतीपथावर आहे. स्वतःच्या सत्ताकाळात काहीच करता आले नाही. आता महायुती सरकारने केलेल्या कामाचे श्रेय लाटण्यासाठी खासदारांची स्टंटबाजी सुरू आहे. लोकसभेत या मार्गासाठी एक हजार कोटींची मागणी करणे ही केवळ नौटंकी आहे. जेव्हा स्वतःच्या पक्षाचे सरकार असताना निधी रोखला गेला, तेव्हा खासदार मूग गिळून का.गप्प बसले होते ? आता काम पूर्णत्वाकडे जाताना श्रेयासाठी त्यांची धडपड सुरू असल्याचा टोलाही भोसले यांनी लगावला. ज्यांनी प्रकल्पाला खीळ घातली, तेच आता श्रेयाचा टाहो फोडत आहेत. धाराशिवची जनता सुज्ञ असून खासदारांचा हा वरातीमागून घोडे दामटण्याचा प्रकार सगळ्यांना माहीत असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.