धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव येथील पोहनेर गावात एमटीएस ऑलिम्पियाड 2026 मध्ये उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा ग्रामस्थांच्या वतीने गुणवंत विद्यार्थी सन्मान सोहळा उत्साहात पार पडला. शनिवारी (दि.14) पोहनेर येथील सभागृहात आयोजित कार्यक्रमात गोल्ड मेडल प्राप्त 9 विद्यार्थी तसेच उत्तीर्ण 11 विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष विकास कांबळे होते. 

प्रमुख पाहुणे म्हणून धाराशिव पंचायत समितीच्या नूतन सभापती गोकर्णा कदम, उपसभापती प्रमोद भैय्या पाटील, माजी सदस्य गोपाल कदम, सरपंच उपासना धावारे, ग्रामसेवक अयोध्या शिंदे, माजी सरपंच मोहनराव देशमुख, उपाध्यक्ष विजय अडगळे आणि मुख्याध्यापक डी. एस. पोवळे उपस्थित होते. या प्रसंगी सभापती गोकर्णा कदम व उपसभापती प्रमोद पाटील यांनी शाळेच्या दुरुस्ती व आवश्यक भौतिक सुविधांसाठी निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक विश्वास शिंदे यांनी केले. त्यांनी शाळेची प्रगती, विद्यार्थ्यांचे यश आणि शाळेसमोरील अडचणी याविषयी सविस्तर माहिती देत ग्रामस्थांनी दिलेल्या सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

मान्यवरांच्या हस्ते एमटीएस ऑलिम्पियाडमध्ये गोल्ड मेडल प्राप्त 9 विद्यार्थ्यांना ट्रॉफी, शैक्षणिक साहित्य व पुष्पहार देऊन गौरविण्यात आले. तसेच उत्तीर्ण 11 विद्यार्थ्यांचाही सत्कार करण्यात आला. याशिवाय किसान विद्यालय पोहनेर येथील मुलांच्या व मुलींच्या व्हॉलीबॉल संघाने तालुका व जिल्हा स्तरावर प्रथम क्रमांक मिळविल्याबद्दल सर्व खेळाडूंचा विशेष सन्मान करण्यात आला. ग्रामस्थांच्या वतीने जि.प. प्रा. शाळा पोहनेरचे मुख्याध्यापक शिंदे व्ही. बी., सहशिक्षक जाधव आर. सी., अंबुरे बी. ए. तसेच किसान विद्यालय पोहनेरचे मुख्याध्यापक पोवळे, महेश देशमुख, तेजस्विनी धावारे यांचा उत्कृष्ट कार्याबद्दल सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजय देशमुख यांनी केले, तर आभार प्रदर्शन विश्वास शिंदे यांनी केले.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रदीप देशमुख, दयानंद सारफळे, महेश कुंभार, रघुनाथ क्षिरसागर, पवन देशपांडे, राहुल यादव, भारत यादव, विजय घोलकर तसेच पोहनेर ग्रामस्थांनी विशेष सहकार्य केले. कार्यक्रमास मोठ्या संख्येने पालक, ग्रामस्थ व शिक्षणप्रेमी नागरिक उपस्थित होते. 

 
Top