धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव पंचायत समितीच्या सभापतीपदी भाजपाच्या गोकर्णा गोपाळ कदम यांना 16 मते मिळाल्याने त्या विजयी झाल्या. तर त्यांच्या विरूध्द शिवसेना ठाकरे गटाच्या सरस्वती मोहन वाघुलकर यांना 7 मते पडल्यामुळे त्यांना पराभव पत्कारावा लागला. तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या प्रिया अमोल घोगरे यांनी मतदानात भाग न घेता तटस्थ राहिल्या. सभापतीपदी निवड झाल्यानंतर पिठासन अधिकारी ओंकार देशमुख यांनी कदम यांचा सत्कार केला.
धाराशिव पंचायत समितीमध्ये भाजपचे 13, पुरस्कृत अपक्ष 1, शिवसेना शिंदे 2, शरद पवार राष्ट्रवादी 1 तर ठाकरे शिवसेना 7 याप्रमाणे पक्षीय बलाबल आहे. सभापतीच्या निवडीनंतर उपसभापतीचीही निवड करण्यात आली. उपसभापतीपदी भाजपचे प्रमोद भाऊसाहेब पाटील हे 16 मतांनी विजयी झाले. तर त्यांच्या विरूध्द शिवसेना ठाकरे गटाच्या आशा राजदीप गायकवाड यांना 7 मतावर समाधान मानावे लागले. या उपसभापतीच्या निवडणुकीतही शरद पवार राष्ट्रवादी गटाच्या प्रिया अमोल घोगरे तटस्थ राहिल्या. यावेळी सहायक पिठासन अधिकारी म्हणून मृणाल जाधव व गटविकास अधिकारी राजीव कांबळे यांनी काम केले. विजयी उमेदवारांच्या समर्थकांनी पंचायत समिती आवारामध्ये फटाक्याची अतिषबाजी व गुलाल उधळून जल्लोष केला.
