भुम /  प्रतिनिधी 

तालुक्यातील वालवड येथील महिला शेतकरी श्रीमती वृंदावनी अनिल यादव यांचा महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला. आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष 2026 निमित्त बुधवार दिनांक 11 रोजी महाराष्ट्राच्या राज्य विधिमंडळ दोन्ही सभागृहाच्या संयुक्त बैठकीदरम्यान राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते श्रीमती यादव यांचा सन्मान करण्यात आला. 


यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार यांच्यासह विधिमंडळाचे सदस्य हजर होते. राज्याच्या कृषी विभागातून पाच कर्तृत्ववान महिला शेतकऱ्यांची निवड करण्यात आली होती. यामध्ये धाराशिव लातूर परभणी हिंगोली व नांदेड या पाच जिल्ह्याच्या लातूर विभागातून भूम तालुक्यातील वालवड येथील महिला शेतकरी वृंदावनी यादव यांची त्यांच्या जिद्द व अपार कष्टाच्या बळावर निवड झालेली आहे. त्यांनी महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या मदतीने डाळ मिल प्रकल्पाची उभारणी केली असून तो प्रकल्प अध्याप ही सुरळीत कार्यान्वित आहे. त्यांनी महिलांचे संघटन करून त्यांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. वृंदावनी यादव यांचे लग्न झाल्यानंतर आठ वर्षातच त्यांच्या पतीचे दुःखद निधन झाले माहेरी व सासरी 18 विश्व दारिद्र्य असताना त्यांच्यावर हा मोठा आघात झाला. त्यांनी तीन लहान मुलांचं पोषण करत स्वतःला सावरत संसाराचा गाडा एकटीने हाकला. सुरुवातीच्या काळात त्यांनी शेतमजुरी केली काही दिवसांनी दहा महिलांना एकत्र करून बचत गट तयार  केला. त्या गटाद्वारे लहान लहान कर्ज घेऊन गटाची वाटचाल सुरू केली व त्यामधून कुटुंबाचा उदरनिर्वाह सुरळीत चालू झाला. 2019 मध्ये त्यांनी वाल्मीकेश्वर शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन केली. त्यामध्ये त्यांनी सोबतीला त्या भागातील विधवा व परित्यक्त्या महिलांना सहभागी करून घेतले. 


प्रत्येक सभासद महिलेचे हजार रुपये सभासद फी घेऊन त्यांनी एक डाळ मिल चालू करण्याकडे वाटचाल केली. तीन वर्ष कंपनी तोट्यामध्ये चालल्यानंतर देखील त्यांनी धीर न सोडता सोयाबीन खरेदी विक्री, डाळ मिल, भाजीपाला व्यापारात दिमागदार कामगिरी केली. त्यांच्या कंपनीमध्ये सध्या पाच महिला काम करत आहेत. भविष्यात त्यांना 200 महिलांना रोजगार मिळवून द्यायचा आहे. आजवर त्यांना अहिल्याबाई होळकर, स्वर्गीय सुषमा स्वराज स्मृती पुरस्कार आणि कृषी विभागाच्या जिल्हास्तरीय पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आलेले आहे यासाठी त्यांना लातूरचे कृषी सहसंचालक महेश तीर्थकर, जिल्हा अधीक्षक श्री मोरे, भूम तालुका कृषी अधिकारी अतुल ढवळे यांचे सहकार्य लाभले. विधिमंडळातील सत्कार दरम्यान उप कृषी अधिकारी कैलास चोरमले, वाल्मिक किशोर ऍग्रो प्रोडूसर कंपनीचे सचिव महादेव मोहिते, महिला सभासद सोनिया मोहिते, दादा काटे हे हजर होते.


 
Top