परंडा , येथील ग्लोबल हायस्कूल येथे आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांची जयंती मोठ्या उत्साहात संपन्न झाली. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई जिल्हा केंद्र धाराशिव यांच्या वतीने ग्लोबल हायस्कूल परंडा येथे आयोजित करण्यात आलेल्या व्याख्यानात प्रा. डॉ. अरविंद हंगरगेकर यांनी वरील प्रतिपादन केले ,यशवंतराव चव्हाण यांचे व्यक्तित्व आणि कर्तृत्व या विषयाला अनुसरून पुढे बोलताना त्यांनी विद्यार्थ्यांना यशवंतरावांच्या जीवनाविषयीचा यथोचित वृत्तांत कथन केला. यशवंतरावांचे बालपण,शिक्षण, कौटुंबिक परिस्थिती त्याचबरोबर यशवंतरावांच्या व्यक्तिमत्त्वाचे विविध आयाम समाजाऊन सांगताना ते उत्तम साहित्यिक, अभिजात रसिक, उत्तम राजकारणी, मातृभक्त, माणूस वेल्हाळ व्यक्तिमत्व कसे होते या अनुषंगाने त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू त्यांनी स्पष्ट केले. त्याचबरोबर यशवंतरावांच्या कार्याचा विविधांगी आढावाही त्यांनी समर्पक पद्धतीने आपल्या व्याख्यानातून घेतला. अत्यंत भावनिक शब्दांमध्ये यशवंतरावांचा आणि वेणूताईंचा नाते संबंध त्यांनी उलगडुन दाखविला.
सुरुवातीला यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेचे पूजन करून मान्यवरांचे यथोचित स्वागत आणि सत्कार ग्लोबल हायस्कूलच्या वतीने करण्यात आले. नंतर या संस्थेच्या प्राचार्या सौ अशाताई मोरोजकर यांनी प्रास्ताविकपर मनोगतातून संस्थेची ध्येयधोरणे स्पष्ट केली. संस्थेच्या सामाजिक कार्याची रूपरेषा सांगितली. त्यानंतर कार्यक्रमाचे प्रास्ताविक यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, जिल्हा केंद्र धाराशिवचे सचिव प्राचार्य डॉ. रमेश दापके यांनी केले. प्रास्ताविकातून यशवंतराव चव्हाण यांच्या कार्याची ओळख करून देतानाच प्रतिष्ठांच्या जिल्हा केंद्राच्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या विविध उपक्रमाविषयीची सविस्तर माहिती त्यांनी दिली. अध्यक्षीय समारोप यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान जिल्हा केंद्र धाराशिवचे अध्यक्ष, जेष्ठ नेते जीवनराव गोरे यांनी केला. अध्यक्षीय समारोपातून त्यांनी यशवंतरावांच्या आयुष्यातील काही महत्त्वाच्या प्रसंगावरती प्रकाश टाकला. त्याचबरोबर जिल्हा केंद्राचा हेतू आणि उद्दिष्टे त्यांनी व्यक्त केली. तसेच विद्यार्थ्यांनी यशवंतराव चव्हाण यांच्या व्यक्तिमत्त्वाचा आदर्श समोर ठेवून जीवनात वाटचाल करावी असा मूलमंत्रही दिला.
कार्यक्रमाचे आभार दिलीप शेरे यांनी मानले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आकांक्षा देशमुख यांनी केले. कार्यक्रमाला सामाजिक,राजकीय, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवर व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.
