धाराशिव (प्रतिनिधी)- मागणीपेक्षा अधिक वीज निर्मिती आहे असं सरकार सांगत आहे. मग ग्रामीण भागातील नागरिकांना लोड शेडिंचा त्रास का सहन करावा लागत आहे? असा प्रश्न आमदार कैलास पाटील यांनी विधानसभेत औचित्याच्या मुद्द्याद्वारे उपस्थित केला.
यावेळी आमदार पाटील म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कालच आपले राज्य हे एनर्जी सरप्लस म्हणजे मागणीपेक्षा वीजनिर्मिती जास्त असलेले राज्य आहे. मग असे असताना ग्रामीण भागामध्ये वाड्या, वस्त्यावर संध्याकाळी चार तास व सकाळी चार तास सिंगल फेजची विज कपात केली जात आहे. ज्यामुळे नागरिकांना उन्हाळ्याच्या काळात तब्बल आठ तास लोड शेडिंग चा त्रास सहन करावा लागत आहे. संध्याकाळी सहा ते दहा तर सकाळी पाच ते नऊ या काळात लोडशेडिंग होत आहे.शिवाय शेतीपंपाची ही वेगळी परिस्थिती नाही 24 तासांपैकी फक्त तीन ते चार वीज असते त्यातही पुरेशा दाबाने वीज पुरवठा होत नाही. त्या चार तासांमध्येही अनेकदा वीज जात असल्याचं चित्र आहे. यावर सरकारने लक्ष द्यावे व ग्रामीण भागात लोड शेडिंगमुळे नागरिकांना विजेचा जो त्रास होत आहे तो थांबवावा अशी मागणी आमदार कैलास पाटील यांनी सभागृहात केली आहे. शेती पंपालाही पुरेशा दाबाने व नियमित वीज पुरवठा करून शेतकऱ्यांना पूर्ण वेळ वीज उपलब्ध करून द्यावी अशी ही मागणी यावेळी आमदार पाटील यांनी केली आहे.
