धाराशिव (प्रतिनिधी)- सरकारने जनतेच स्वप्नरंजन करण्याचा प्रयत्न केला असाच हा अर्थसंकल्प आहे. वास्तव परिस्थितीच भान हरवलेला हा अर्थसंकल्प दिसत आहे. कर्जाच्या विळख्यात अडकलेलं सरकार केलेल्या घोषणा पूर्ण कस करणार एवढं जनतेला सांगावे, असे आवाहन खासदार ओमराजे निंबाळकर यांनी सरकारला दिले आहे.
यावेळी ओमराजे निंबाळकर म्हणाले की, शेतकरी कर्जमाफी योजनेला इतका विलंब केल्यान या योजनेतील लाभार्थी निवडीचे निकष अटी पाहिल्याशिवाय याबाबत अधिक न बोललेल बर. या मागेही या सरकारने अशीच कर्जमाफीची घोषणा केली पण अद्याप लाखो लोक या योजनेपासून वंचित आहेत. शिवाय त्यावेळी अटी,निकष यामुळं शेतकरी मेटाकुटीला आला होता. शिवाय 2019 ला उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री असताना केलेल्या कर्जमाफीमध्ये तेव्हाच दोन लाख रुपयापर्यंतची तरतुद केली होती परंतु आता पाच वर्ष होऊनही लाभाची रक्कम तेवढीच का असा प्रश्न निर्माण झाला आहे. कारण हे सरकार सत्तेत आल्यावर महात्मा ज्योतिराव फुले या योजनेची एकरकमी परतफेड योजना राबवली नाही त्यामुळं असे लाखो लाभार्थी वंचित राहणार आहेत. याचा विचार सरकारने केलेला नाही. नुसते मेट्रो प्रकल्प, शक्तीपीठ असल्या योजना कोणासाठी आणायच्या हे सर्वश्रुत आहे. पण सामान्य माणूस आपल्या बाजून असूनही त्याचा सरकार सत्तेत आल्यावर विचार करत नाही हे आज दिसून येत आहे.
