धाराशिव (प्रतिनिधी)-  जिल्हा मुख्यालय असलेल्या धाराशिवसह तुळजापूर आणि कळंब पंचायत समितीच्या सभापती-उपसभापती निवडीत महायुतीचा झेंडा फडकला आहे. भाजपा आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यात महायुतीचे राजकीय वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या या निवडणुकीत महायुतीने मुसंडी मारत तिन्ही ठिकाणी एकतर्फी विजय मिळवला आहे. या विजयामुळे जिल्ह्यात महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह संचारला असून ठिकठिकाणी गुलाल उधळून जल्लोष करण्यात येत आहे.

केवळ धाराशिव, कळंब आणि तुळजापूरच नव्हे, तर उमरगा आणि लोहारा पंचायत समितीवरही महायुतीने निर्विवाद बहुमत मिळवत आपला झेंडा फडकवला आहे.  तुळजापूरमध्ये कुलस्वामिनी तुळजाभवानी मातेचा आशीर्वाद घेत महायुतीच्या उमेदवारांनी विजयोत्सव साजरा केला. हा विजय जनतेच्या विश्वासाचा आणि कार्यकर्त्यांच्या कष्टाचा आहे. नवनिर्वाचित सभापती आणि उपसभापतींनी जनसेवेला प्राधान्य देऊन तालुक्याच्या विकासासाठी कटिबद्ध राहावे असे आवाहन आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी केले आहे. आमदार पाटील यांनी सर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करत त्यांना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. या विजयामुळे महायुतीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास वाढला असल्याचे चित्र आहे.


 
Top