धाराशिव (प्रतिनिधी)- जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, आळणी येथे विद्यार्थी स्वयंशासन दिन अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. या विशेष उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांना शाळेच्या दैनंदिन कामकाजाचा प्रत्यक्ष अनुभव घेण्याची संधी मिळाली.

या कार्यक्रमाच्या निमित्ताने इयत्ता सातवीतील विद्यार्थ्यांना निरोप देण्यात आला. शाळेतील त्यांच्या आठवणींना उजाळा देत त्यांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. स्वयंशासन दिनाच्या निमित्ताने इयत्ता सातवीतील विद्यार्थ्यांनी शाळेचे संपूर्ण कामकाज एक दिवसासाठी हाती घेतले. ‌‘स्कूल डे‌’ उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांनी मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक तसेच शिक्षकांची भूमिका पार पाडत शाळेचे व्यवस्थापन कसे चालते याचा प्रत्यक्ष अनुभव घेतला.

या दिवशी कुमारी राजनंदिनी सुनील माळी हिने मुख्याध्यापक म्हणून तर आदित्य बाबासाहेब पौळ याने उपमुख्याध्यापक म्हणून जबाबदारी उत्कृष्टपणे पार पाडली. सर्व विद्यार्थ्यांनी तासिका निहाय वेळापत्रक तयार करून प्रत्येक वर्गात नियोजनबद्ध अध्यापन केले. त्यामुळे संपूर्ण दिवस शिस्तबद्ध व आनंददायी वातावरणात पार पडला.

या उपक्रमासाठी मार्गदर्शक म्हणून श्री पेठे, श्री दीक्षित व श्रीमती नवले यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी मुख्याध्यापक श्री बशीर तांबोळी यांनी विद्यार्थ्यांच्या उपक्रमशीलतेचे कौतुक करून इयत्ता सातवीतील सर्व विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक व वैयक्तिक वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.या कार्यक्रमासाठी शालेय व्यवस्थापन समिती च्या अध्यक्षा सौं संजीवनी पौळ उपाध्यक्ष सौं अफसाना शेख उपस्थित होते  हा स्वयंशासन दिन विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरला असून त्यांच्या नेतृत्वगुणांना व जबाबदारीची जाणीव वाढविणारा अनुभव ठरला.  शेवटी सातवीच्या सर्व विद्यार्त्यांनी आपले अनुभव कथन करून त्यांना अध्यापन करणाऱ्या शिक्षकांचे ऋण व्यक्त केले.

 
Top