धाराशिव (प्रतिनिधी)- सकल संत सेवा धाराशिव आयोजित बार्शी नाका येथील स्वयंवर मंगल कार्यालय चालू असलेल्या संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या चरित्र कथेला भाविकांचा भरभरून प्रतिसाद मिळत असून ,वैराग्य महामेरू संत गोरोबाकाका यांचे चरित्र लेखक कथाकार हभप दीपक महाराज खरात (श्रीक्षेत्र तेर) यांच्या सुमधुर वाणीतून संगीतमय कथेत रंगदेवता अवतरलेली आहे.
प्रथमत: ग्रंथ पूजन, दीपप्रज्वलन ,व ज्ञानेश्वर महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केले. तसेच कथेचे मुख्य प्रेरणास्थान कै. हभप श्यामराव दहिटणकर (काका) यांच्याही प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. प्रस्तावनेत स्व. दहिटणकर यांच्या आठवणींना अभिजीत कदम यांनी उजाळा देत कथेसंदर्भात माहिती दिली. काकांची ऑडिओ क्लिप साऊंड सिस्टिमद्वारे उपस्थिताना ऐकवण्यात आली. याप्रसंगी सर्वांचे डोळे पाणावलेले होते.
नंतर काकांच्या आठवणींना खरात महाराजांनी अश्रू नयनांनी उल्लेख केला. महाराज म्हणाले की, दहिटणकर काका असल्या वेळेचेसचे चित्र व त्यांच्या नसल्या वेळेसचे चित्र खूपच वेगळे असून, याप्रसंगी त्यांची उणीव निश्चितच जाणवते. त्यांच्या पश्चात हा कार्यक्रम जिव्हाळ्याने होत आहे. त्यांच्या स्मृती सांगणं हाही एक कथेचा भाग आहे .काकांनी अकरा वर्षापूर्वी धाराशिव येथील कृष्ण मंदिरात प्रवचनासाठी मला बोलावले होते. धाराशिव मधल्या वातावरणात संत चरित्राची पेरणी झाली पाहिजे ही त्यांची तळमळ होती. धाराशिव शहराच्या इतिहासात सकल संत सेवा समिती मार्फत संत गोरोबाकाका, संत तुकाराम महाराज, व यावर्षी चालू असलेली संत ज्ञानेश्वर महाराज यांची चरित्र कथा मेहनतीने, भक्तीने ,आणि नियोजनपूर्वक यशस्वी करत आहेत.
श्रोत्यांना ज्ञानगंगेत स्नान करविताना महाराज पुढे उपदेश करतात की, जीवन ग्रंथ हा सर्वांच्या जन्मासोबत मिळालेला असून, पहिल्या पानावर जन्म दिनांक आहे. तर शेवटच्या पानावर मृत्यू दिनांक आहे. तर मधली पाने कोरी असून, त्यावर आपल्या कार्याचा उल्लेख करावयाचा आहे. असे सांगत गोदावरीच्या काठावरून ज्ञानोबाची कथा सुरू होते. आपेगाव हे अत्यंत पुरातन भूमी आहे. भगवान शिवजीची व ऋषीमुनींची ती साधना भूमी आहे. हरिहर पंत कुलकर्णी यांना तीन अपत्ये होते. रामचंद्रपंथ ,केशव पंथ, मोहनाबाई. त्रिंबकपंत हे ज्ञानेश्वर माऊलीचे पंजोबा होते. त्रिंबकपंत यांचे चिरंजीव गोविंद पंत हे होते .त्यांना अपत्ये नव्हते. याची त्यांना उणीव होती. परंतु तेजपुंज असे नाथपंथीय साधू त्यांच्या दारी आले. ते गहिनीनाथ होते. त्यांनी आशीर्वाद दिला की, योग्य वेळी योग्य फळ मिळणार आहे.! गर्भसंस्काराला परंपरेने महत्त्व दिलेले आहे. म्हणून गर्भवती मातेने संत चरित्र वाचावे पण आज सिरीयल आणि चित्रपट पाहिले जातात ही शोकांतिका आहे.
संतांचे विचार व राष्ट्रपुरुषांचे आचार आपल्या जीवनात उतरणे गरजेचे आहे. आषाढ शुद्ध एकादशीला गोविंद पंतांच्या पोटी अपत्य झाले म्हणून त्यांचे नामकरण करताना विठ्ठल या नावाने नाम संस्कार केले. अशा प्रकारे संगीत टीमची मंजुळ साथ घेत महाराजांनी उपस्थित भाविकांना भक्तीरसात चिंब केले. तदनंतर अन्नदाते यांच्या हस्ते आरती करून, त्यांचा सन्मान करण्यात आला व पसायदानाने कथेची सांगता करण्यात आली. कथा श्रवणासाठी भाविकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. शेवटी सर्वांनी सात्विक महाप्रसादाचा शिस्तबद्ध लाभ घेतला.
