सोलापूर (प्रतिनिधी)- मध्य रेल्वेने आपल्या मौल्यवान प्रवाशांना सुरक्षित, सुरळीत आणि आरामदायी प्रवास अनुभव देण्याच्या आपल्या अढळ वचनबद्धतेनुसार, त्यांच्या नेटवर्कमध्ये अनधिकृत आणि विनातिकीट प्रवासाला आळा घालण्यासाठी उपाययोजना कडक केल्या आहेत.

कडक आणि विशेष तिकीट तपासणी मोहिमेद्वारे, मध्य रेल्वेने 2025-26 (एप्रिल-2025 ते फेब्रुवारी-2026) या आर्थिक वर्षात लक्षणीय निकाल मिळवले आहेत.


आर्थिक वर्ष 2025-26

मध्य रेल्वेच्या विशेष तिकीट तपासणी पथकांनी आर्थिक वर्ष 2025-26 (एप्रिल-2025 ते फेब्रुवारी-2026) मध्ये विनातिकीट किंवा अयोग्य/ अवैध प्रवास करणाऱ्या 37.99 लाख प्रवाशांना विनातिकिट पकडले, तर गेल्या आर्थिक वर्षाच्या याच कालावधीत 34.60 लाख प्रवाशांना पकडले. यावर्षी हे प्रमाण  जवळपास 10%ने वाढले आहे. आर्थिक वर्ष 202526 (एप्रिल 2025 ते फेब्रुवारी 2026) या कालावधीत रुपये 227.03 कोटी इतकी विक्रमी दंडरक्कम वसूल करण्यात आली. जी मागील आर्थिक वर्षातील याच कालावधीत रु. 185.62 कोटी दंडरक्कम वसूल करण्यात आली होती. या दंडाच्या रकमेत 22% पेक्षा अधिक वाढ नोंदविण्यात आली आहे.

फेब्रुवारी 2026 महिन्यात मध्य रेल्वेच्या तिकीट तपासणी पथकांनी विनातिकीट, अयोग्य किंवा अवैध प्रवास करणारे 3.65 लाख प्रवाशांना पकडले. त्याच्या तुलनेत फेब्रुवारी 2025 मध्ये 3.32 लाख प्रवासी पकडले गेले होते, म्हणजेच यावर्षी सुमारे 10% वाढ यामध्ये  नोंदवली गेली आहे.

फेब्रुवारी 2026 मध्ये नियमभंग करणाऱ्या प्रवाशांकडून 23.27 कोटी रुपये इतकी दंडरक्कम वसूल करण्यात आली, तर फेब्रुवारी 2025 मध्ये ही रक्कम 18 कोटी रुपये होती. यामध्ये यावर्षी सुमारे 30% ने वाढ झाली आहे.

आर्थिक वर्ष 2025-26 (एप्रिल-2025 ते फेब्रुवारी-2026) साठी विनातिकीट किंवा अवैध तिकीटासह प्रवास करणाऱ्यांकडून वसूल केलेल्या दंडाच्या रक्कमेची विभागवार माहिती खालीलप्रमाणे आहे: 

मुंबई विभाग - 16.16 लाख प्रकरणांमध्ये 71.32 कोटी रुपये, भुसावळ विभाग - 8.94 लाख प्रकरणांमध्ये 75.29 कोटी रुपये, पुणे विभाग - 4.31 लाख प्रकरणांमध्ये 27.14 कोटी रुपये, नागपूर विभाग - 4.00 लाख प्रकरणांमध्ये 24.93 कोटी रुपये, सोलापूर विभाग - 2.30 लाख प्रकरणांमध्ये 10.53 कोटी रुपये आणि, अमुख्यालय - 2.28 लाख प्रकरणांमध्ये 17.82 कोटी रुपये

मध्य रेल्वे अनधिकृत प्रवास रोखण्यासाठी बहुआयामी धोरणाचा अवलंब करते. यामध्ये स्टेशन तपासणी, अँबुश तपासणी, फोर्ट्रेस तपासणी, सखोल तपासणी आणि मेगा तिकीट तपासणी मोहीम यांचा समावेश आहे.ही कारवाई सर्व विभागांतील मेल/एक्सप्रेस गाड्या, प्रवासी गाड्या आणि विशेष गाड्या यामध्ये तसेच मुंबई व पुणे विभागातील उपनगरी गाड्यांमध्ये नियमितपणे करण्यात येते.

मध्य रेल्वे प्रवाशांना आवाहन करते की त्यांनी अधिकृत विक्रेत्यांनी जारी केलेल्या वैध तिकिटांसह किंवा रेल्वे स्टेशन बुकिंग काउंटरवरून किंवा एटीव्हिएम द्वारे किंवा http://www.irctc.co.in वेबसाइटद्वारे तिकीट काढून प्रवास करावा. प्रवासी त्यांच्या मोबाईल फोनवर रेल वन ॲप डाउनलोड करू शकतात आणि रेल वन ॲपद्वारे तिकिटे बुक करू शकतात. मध्य रेल्वे प्रवाशांना असेही आवाहन करते की, बनावट तिकीट तयार करण्यासाठी किंवा मिळवण्यासाठी कोणत्याही प्रकारचे फसवे मार्ग वापरू नयेत आणि अशा तिकिटांवर प्रवास करू नये. हा गुन्हा भारतीय न्याय संहिता अंतर्गत दंड आणि कमाल 7 वर्षांपर्यंत कारावासाची शिक्षा किंवा दोन्ही होऊ शकतात. रेल्वे विनातिकीट प्रवासाबाबत शून्य-सहिष्णुता धोरणाचा पुनरुच्चार करते आणि प्रवाशांना आरामदायी आणि सन्माननीय प्रवासाचा आनंद मिळावा यासाठी वचनबद्ध आहे. सुरक्षित प्रवास करा, जबाबदारीने प्रवास करा, सन्मानाने प्रवास करा.

 
Top