धाराशिव (प्रतिनिधी)- जिल्ह्यात मंगळवारी रात्री तसेच बुधवारी, गुरूवारी अवकाळी पावसाने हजेरी लावत शेतकऱ्यांना मोठा फटका दिला. काढणीला आलेली ज्वारी, गहू, हरभरा यांसह आंबा, द्राक्ष, केळी आदी फळपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

उमरगा व लोहारा तालुक्यांत मंगळवारी पावसाचा जोर अधिक होता. मुरुम परिसरातही फळबागांचे मोठे नुकसान झाल्याचे समोर आले आहे. बुधवारी कळंब व वाशी तालुक्यातील काही गावांसह धाराशिव तालुक्यातही पावसाची हजेरी लागली. येरमाळा व रत्नापूर परिसरात सायंकाळी चारच्या सुमारास सुरू झालेला पाऊस सुमारे तासभर कोसळला.वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली. मागील दोन दिवसांपासून वातावरणात बदल जाणवत होता. काढणीच्या टप्प्यात असलेल्या पिकांचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.लोहारा : मंगळवारी सायंकाळी अचानक अवकाळी पावसासहतालुक्यातवादळी वारे आणि गारपीट झाली. सुमारे पाऊण तास चाललेल्या या पावसामुळे परिसरातील मोघा, खेड, हराळी, धानुरी,कास्ती, जेवळी आदी गावांतील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. काढणीस तयार असलेली ज्वारी, गहू, हरभरा, मका व सूर्यफूलया पिकांचे नुकसान झाले.अचानक बदललेल्या हवामानामुळे शेतकऱ्यांना कोणतीही पूर्वतयारी करता आली नाही. गारपीट व जोरदार वाऱ्यामुळे उभ्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. विशेषतः काढणीच्या उंबरठ्यावर असलेल्या पिकांना मोठा फटका बसल्याने हाती येणारा उत्पन्नाचा आधारच ढासळला आहे.दरम्यान, द्राक्ष बागायतदारांनाही या अवकाळीचा मोठा फटका बसला. गारांमुळे द्राक्षांचे घड जखमी होऊन मोठ्या प्रमाणात गळून पडले, तर वादळी वाऱ्यामुळे बागांचे मंडपही नुकसानग्रस्त झाले. काही भागात वीजपुरवठाही खंडित झाला.महसूल व कृषी विभागाने नुकसानीचे पंचनामे सुरू केले असून, बाधित शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी होत आहे.

 
Top