धाराशिव (प्रतिनिधी)- शहरातील प्रत्येक वार्डातून पाच प्रभागातून दहा महिलांना स्वयंरोजगारासाठी स्वावलंबी करण्यासाठी प्रधानमंत्री, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेतून अर्थसहाय्य मिळवून देऊ. तर महिलांना त्यांच्या पायावर उभे करण्यासाठी मदत करण्यात येईल. तसेच शहरातील कचरा संकलनासाठी वीस घंटागाड्या देण्यासह हातलाई तलावावर म्युझिकल फाऊंटन करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. कोणत्याही परिस्थितीत महिलांना आर्थिक सक्षम करण्यासाठी निश्चितपणे पाठपुरावा करण्यावर भर देणार असल्याचे आश्वासन जिल्हा परिषदेच्या नूतन अध्यक्ष अर्चनाताई पाटील यांनी दि.24 मार्च रोजी दिले आहे.
धाराशिव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात धाराशिव नगर परिषदेच्या महिला बाल कल्याण विभागाच्यावतीने जागतिक महिला दिनानिमित्त नारीशक्ती सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून बोलत होत्या. यावेळी धाराशिवच्या नगराध्यक्ष नेहा राहुल काकडे, कळंबच्या नगराध्यक्ष सुनंदा शिवाजी कापसे, धाराशिव पंचायत समितीच्या सभापती गोकर्णा गोपाळ कदम, मुख्याधिकारी नीता अंधारे यांची प्रमुख उपस्थिती होती. या सोहळ्यात विविध क्षेत्रात कर्तृत्व गाजवलेल्या 30 महिलांचा सन्मान चिन्ह, मोगऱ्याचे रोप व शाल देऊन पाटील यांच्या हस्ते यथोचित सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महिला बाल कल्याण उपसभापती दिपाली पाटील यांनी तर सूत्रसंचालन वैशाली सोनवणे यांनी आणि उपस्थितांचे आभार वैशाली सोनवणे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी महिला व बाल कल्याण विभागाचे सर्व कर्मचारी, सर्व नगरसेवक यांनी परिश्रम घेतले. यावेळी महिला व नगर परिषदेचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
