भूम (प्रतिनिधी)- नगरपरिषदेचे कर्मचारी आणि प्रशासन यांना सातत्याने वेठीस धरून पालिकेच्या माध्यमातून नागरिकांचा सर्वांगीण विकास होऊ दिला जात नाही, असा खळबळजनक आरोप भूमच्या नगराअध्यक्षा संयोगिता संजय गाढवे यांनी केला आहे. 

जनशक्ती विकास आघाडीच्या नगरसेवकांकडून विकासकामांत वारंवार खोडा घातला जात असल्याच्या निषेधार्थ त्यांनी पालिका सभागृहात 11 मार्च रोजी पत्रकार परिषद आयोजित केली होती. घनकचरा टेंडरवरून शहराच्या स्वच्छतेचा प्रश्न ऐरणीवर पत्रकार परिषदेत बोलताना नगराध्यक्षांनी शहरातील स्वच्छतेच्या प्रश्नावर चिंता व्यक्त केली. त्या म्हणाल्या, “शहरातील घनकचरा व्यवस्थापनाचे टेंडर 31 मार्च पूर्वी मंजूर करणे अत्यंत आवश्यक आहे. मात्र, जनशक्ती विकास आघाडीचे नगरसेवक या कामात मुद्दाम अडथळे निर्माण करत आहेत. जर वेळेत टेंडर मंजूर झाले नाही आणि शहरात स्वच्छतेचा प्रश्न निर्माण झाला. तर त्याला पूर्णतः हे विरोधी नगरसेवकच जबाबदार असतील.“

 कर्मचाऱ्यांना वेठीस धरू नका-सूरज गाढवे 

मुख्याधिकाऱ्यांच्या दालनात बेशरमची फुले ठेवून करण्यात आलेल्या आंदोलनाचा आलमप्रभु शहर विकास आघाडीचे गट नेते सूरज गाढवे यांनी तीव्र शब्दात निषेध केला. ते म्हणाले की, “मुख्याधिकाऱ्यांकडे दोन ठिकाणचा पदभार असल्याने त्यांना इतरत्रही वेळ द्यावा लागतो. अशा परिस्थितीत बेशरमची फुले देऊन आंदोलन करणे चुकीचे आहे. अशा प्रकारांमुळे कर्मचारी पालिकेत काम करण्यास तयार होणार नाहीत, ज्याचा थेट फटका सर्वसामान्य नागरिकांच्या कामांना बसेल.“ विकासासाठी एकत्र येण्याचे आवाहन नगराअध्यक्षा गाढवे यांनी स्पष्ट केले की, निवडणूक संपली असून आता खऱ्या अर्थाने सर्वांनी एकत्र येऊन शहराच्या हिताचे निर्णय घेणे आवश्यक आहे. “मी शहराच्या विकासासाठी कटीबद्ध आहे, परंतु प्रत्येक कामात विनाकारण विरोध केला जात असेल, तर कारभार कसा करायचा? हे जनतेला कळावे म्हणूनच मी ही पत्रकार परिषद घेत आहे,“ असे त्यांनी नमूद केले. या पत्रकार परिषदेला नगरसेविका रिमा शिंदे, नगरसेवक  तथा गटनेते सुरज गाढवे  तौफिक कुरेशी अभिजित शेटे उपस्थित होते या पत्रकार परिषदेत नगरसेविका रिमा शिंदे  यांनी विरोधी नगरसेवक करीत असलेल्या स्टंटबाजीच्या व सोशल मीडियाच्या वापराबाबत स्पष्टीकरण करून विरोधकाच्या या कृतीचा चांगला समाचार घेतला.

 
Top