धाराशिव (प्रतिनिधी)- जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील निपाणी येथे आज दि.18 मार्च रोजी महारेशीम अभियान 2026 अंतर्गत शेतकरी मेळावा व चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले.या मेळाव्यात रेशीम शेती करताना शेतकऱ्यांना येणाऱ्या विविध अडचणी समजून घेण्यात आल्या तसेच रेशीम विकासाशी संबंधित विविध शासकीय योजनांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

या कार्यक्रमास जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार,जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मैनाक घोष, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री.राजकुमार मोरे,कळंब येथील गटविकास अधिकारी,तालुका कृषी अधिकारी,उपविभागीय अधिकारी शिंदे,रेशीम विकास अधिकारी श्रीमती वाकुरे यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी कळंब तालुक्यातील क्षेत्रसहायक श्री.एस.एच.सुर्यवंशी,श्री.एन.ए.पवार, तांत्रिक सहाय्यक जुनेद उस्मानी तसेच प्रगतिशील रेशीम शेतकरी श्री.बालाजी पवार आणि चॉकीधारक शेतकरी अतुल लुगडे यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. मार्गदर्शन करताना तज्ज्ञांनी रेशीम शेतीतील उत्पादनवाढ,रोग व्यवस्थापन, कोषपालन तंत्रज्ञान तसेच शासनाच्या विविध अनुदान व सहाय्य योजनांचा लाभ घेण्याबाबत सविस्तर माहिती दिली. शेतकऱ्यांच्या प्रश्नांना उत्तर देत त्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी प्रशासनाने आवश्यक ते सहकार्य देण्याचे आश्वासन दिले.

या मेळाव्यास परिसरातील विविध गावांतील रेशीम शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.तसेच निपाणी गावचे तलाठी,कृषी सहाय्यक,ग्रामसेवक, सरपंच,उपसरपंच व इतर मान्यवरही उपस्थित होते.या उपक्रमामुळे रेशीम शेतीबाबत शेतकऱ्यांमध्ये जागरूकता वाढून उत्पादनवाढीस चालना मिळणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला.

 
Top