धाराशिव (प्रतिनिधी)- माहे मार्च,2026 मध्ये जिल्ह्यात झालेल्या आवकाळी पाऊस व गारपीटीमुळे शेतीपिकांचे तसेच जिवित व वित्तीय नुकसान झाल्याचे निदर्शनास आले आहे.या नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित शेतकऱ्यांना शासनामार्फत मदत मिळण्यासाठी नुकसानाचे अचूक पंचनामे करणे आवश्यक आहे. यासाठी तालुकास्तरीय समितीच्या आदेशानुसार ग्रामस्तरीय समितीमार्फत बाधित क्षेत्रामध्ये तात्काळ पंचनामे करण्यात येत आहेत. संबंधित सर्व यंत्रणांनी नुकसानग्रस्त भागांची पाहणी करून विहित नमुन्यात पंचनामे पूर्ण करावेत, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
त्यानुसार जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी,सर्व उपविभागीय अधिकारी,सर्व उपविभागीय कृषी अधिकारी,धाराशिव,सर्व तहसीलदार तसेच सर्व तालुका कृषी अधिकारी यांना निर्देश देण्यात आले आहेत की, ग्रामस्तरीय समितीमार्फत करण्यात आलेल्या पंचनाम्यांच्या आधारे विहित नमुन्यातील निधी मागणीचा परिपूर्ण प्रस्ताव तात्काळ जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करावा.
जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी देखील आपल्या क्षेत्रातील पीक नुकसान व फळबाग नुकसानीची माहिती संबंधित ग्रामस्तरीय समिती म्हणजे ग्राम महसूल अधिकारी, कृषी सहाय्यक व ग्रामपंचायत अधिकारी यांचेकडे तात्काळ कळवावी. जेणेकरून पंचनामे वेळेत पूर्ण करून शासनाकडे मदतीचा प्रस्ताव सादर करता येईल,असे आवाहन जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी केले आहे. तसेच ज्यांची ई-पीक पाहणी बाकी आहे, त्यांस 31 मार्चपर्यंत मुदतवाढ मिळाली असल्याने सर्व उर्वरित ई-पीक पाहणी सहाय्यकांमार्फत करून घ्यावी, असेही निर्देश देण्यात आले आहेत.