मुरुम (प्रतिनिधी)- श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालय, उमरगा येथे नासकॉम, आयबीएम आणि एच.एच.एच. बेंगलोर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित “डेटा सायन्स ॲण्ड ॲनालिटिक्स” या कौशल्याधारित कोर्सचा प्रमाणपत्र वितरण समारंभ मंगळवार दिनांक 24 मार्च रोजी संपन्न झाला. विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल करिअरच्या दृष्टीने हा कार्यक्रम विशेष प्रेरणादायी ठरला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय अस्वले होते. याप्रसंगी उपप्राचार्य विलास इंगळे, उपप्राचार्य डॉ. पद्माकर पिटले, डॉ. वसंत हिस्सल आणि डॉ. अशोक पदमपल्ले यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी कोर्सचे समन्वयक व ट्रेनर दिल्ली येथील प्रा. भव्य टंडन यांनी विद्यार्थ्यांना आयटी क्षेत्रातील वाढत्या संधी, डेटा सायन्सचे बदलते स्वरूप आणि या कोर्समुळे विद्यार्थ्यांच्या करिअरला मिळणारी नवी दिशा याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. त्यांनी विद्यार्थ्यांना कौशल्याधारित शिक्षणाचे महत्त्व पटवून देत, आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात डेटा सायन्सचे वाढते महत्त्व अधोरेखित केले.
अध्यक्षीय समारोपात डॉ. संजय अस्वले यांनी विद्यार्थ्यांना आयटी क्षेत्रातील नोकरीच्या विविध संधी, त्या मिळवण्यासाठी आवश्यक कौशल्ये तसेच विविध स्पर्धा परीक्षा व करिअरच्या पर्यायांविषयी विस्तृत माहिती दिली. त्यांनी विद्यार्थ्यांनी अशा रोजगाराभिमुख कोर्सेसचा लाभ घेऊन भविष्यात सक्षम करिअर घडवावे, असे आवाहन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संगणकशास्त्र विभागप्रमुख डॉ. सूर्यकांत रेवते यांनी केले. यावेळी विद्यार्थिनी रुची चिंचोले आणि प्रतीक्षा चव्हाण यांनी मनोगत व्यक्त करत कोर्समधील आपले अनुभव आणि शिकण्याची प्रक्रिया उपस्थितांसमोर मांडली. कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले.
याप्रसंगी संगणकशास्त्र विभागातील डॉ. भरत शेळके, प्रा. रेश्मा नितनवरे, डॉ. अजय कांबळे, प्रा. फारुख मुल्ला, प्रा. गजेंद्र बनसोडे, प्रा. अब्रार कादरी, प्रा. श्रद्धा पाटील, प्रा. आरती जाधव, प्रा. सपना राठोड, प्रा. मयुरी माडजे यांच्यासह विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निळकंठ गायकवाड यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्राजक्ता माळी यांनी मानले.
