धाराशिव (प्रतिनिधी)- राज्यातील महिलांमध्ये ॲनिमियाचे प्रमाण 50 टक्क्यांपेक्षा अधिक असल्याचे तसेच श्रमबल पाहणीनुसार पुरुषांची टक्केवारी 59.10 टक्के तर स्त्रियांची टक्केवारी 28.70 टक्के असल्याची बाब लक्षात घेता महिलांच्या आर्थिक व आरोग्य परिस्थितीत सुधारणा करण्याची गरज अधोरेखित झाली आहे.या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाने दि.28 जून 2024 रोजीच्या शासन निर्णयान्वये “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” ही योजना राज्यात सुरू केली आहे.
या योजनेअंतर्गत जिल्ह्यातील सर्व पात्र महिला लाभार्थ्यांनी अर्ज सादर केले असले तरी अनेक लाभार्थ्यांचे बँक खाते आधारशी संलग्न नसल्यामुळे त्यांना अद्याप योजनेचा लाभ त्यांच्या खात्यात जमा झालेला नाही.ही अडचण दूर करण्यासाठी तालुकास्तरावर एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प कार्यालयात “समाधान कक्ष” स्थापन करण्यात आले आहेत.
सर्व महिला लाभार्थ्यांनी संबंधित तालुक्यातील प्रकल्प कार्यालयात जाऊन समाधान कक्षातील कर्मचाऱ्यांकडून आपली समस्या दूर करून घ्यावी, तसेच ज्या बँकेत खाते आहे त्या बँकेत मोबाईल व मूळ आधार कार्डची छायांकित प्रत घेऊन स्वतः उपस्थित राहून आधार संलग्नीकरणाची प्रक्रिया पूर्ण करावी,असे आवाहन करण्यात आले आहे.जिल्ह्यातील सर्व बँकांनीही ही प्रक्रिया मोहिम स्वरूपात राबवून आधार संलग्नीकरण पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
या कार्यात अंगणवाडी पर्यवेक्षिका व सेविकांनी संबंधित महिला लाभार्थ्यांना बँकेत जाणे व आधार संलग्नीकरण करण्यासाठी आवश्यक सहकार्य करावे,असेही सांगण्यात आले आहे.तसेच, काही कारणास्तव ई-केवायसी प्रलंबित असल्यास किंवा चुकीची झाल्यास संबंधितांनी तालुक्याच्या प्रकल्प कार्यालयात जाऊन मार्गदर्शन घेऊन दि.31 मार्च 2026 पर्यंत ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी, असे निर्देश देण्यात आले आहेत.
यामुळे लाभार्थ्यांच्या खात्यावर योजनेचा लाभ विनाविलंब जमा होईल,असे आवाहन अध्यक्ष,जिल्हा परिषद व मुख्य कार्यकारी अधिकारी,जिल्हा परिषद धाराशिव यांनी केले आहे.