तुळजापूर (प्रतिनिधी)- चैत्र पाडव्यानंतर उष्णतेची तीव्रता वाढू लागल्याने आई तुळजाभवानीला उकाड्याचा त्रास होऊ नये, यासाठी तुळजापूरात दरवर्षीप्रमाणे पारंपरिक ‘वारा घालण्याची’ सेवा सुरू झाली आहे. शुक्रवार, दिनांक 20 मार्चपासून या प्राचीन परंपरेचा विधिवत प्रारंभ करण्यात आला.
दुपारी 1 ते 4 या वेळेत देवीच्या मुख्य मूर्तीला मखमली पंख्याने वारा घालण्यात येतो. या सेवेदरम्यान देवीला लिंबू सरबत, पन्हे आणि पेढे यांचा नैवेद्य अर्पण केला जातो. विशेष म्हणजे, ही सेवा भक्ती भावाने अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडली जाते. या पारंपरिक सेवेचा पलंगे परिवाराला मान असून, त्या परिवारातील एक सदस्य दररोज ठरलेल्या वेळेत देवीला वारा घालण्याची सेवा करतो. वारा घालण्यासाठी चांदीचा दांडा, मखमली पंखा आणि पडद्याचा उपयोग केला जातो, ज्यामुळे सेवेला धार्मिक आणि ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले आहे. चैत्र शुद्ध प्रतिपदेच्या दुसऱ्या दिवसापासून सुरू होणारी ही परंपरा मृग नक्षत्रातील पावसापर्यंत अखंड सुरू राहते. दरम्यान, वारा घालण्याच्या कालावधीत गर्भगृहात कुणालाही प्रवेश दिला जात नाही, अशी व्यवस्था करण्यात आली आहे. शेकडो वर्षांची परंपरा जपत, आई तुळजाभवानीची सेवा आजही तेवढ्याच भक्तिभावाने सुरू आहे.
