धाराशिव (प्रतिनिधी)- जिद्द,चिकाटी आणि आईच्या अथक परिश्रमांच्या जोरावर कर्णबधिर असलेला चेतन हणमंत सपकाळ आज आंतरराष्ट्रीय पातळीवरील पिस्तोल नेमबाज म्हणून झळकत आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून वाटचाल करत त्याने मिळवलेले यश हे केवळ क्रीडा क्षेत्रापुरते मर्यादित नसून समाजातील प्रत्येकासाठी प्रेरणादायी ठरत आहे. चेतनचे शालेय शिक्षण पुण्यातील लक्ष्मणराव आपटे प्रशाला, एकात्मिक विशेष युनिट येथे झाले.त्यानंतर मराठवाडा मित्रमंडळाच्या कॉलेज ऑफ कॉमर्समध्ये इयत्ता 11 वी ते एम.कॉमपर्यंत शिक्षण घेत त्याने 73 टक्के गुणांसह ‘ए’ श्रेणीत उत्तीर्ण होण्याची कामगिरी केली. विशेष म्हणजे, कर्णबधिर असूनही त्याने सर्वसामान्य विद्यार्थ्यांमध्ये शिक्षण पूर्ण केले. क्रीडा क्षेत्रातील त्याचा प्रवास सुरुवातीला बॅडमिंटनपासून झाला.
गेल्या आठ वर्षांत चेतनने जिल्हा, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर नेत्रदीपक कामगिरी करत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. सप्टेंबर 2024 मध्ये जर्मनी येथे झालेल्या जागतिक डेफ नेमबाजी स्पर्धेत त्याने दोन कांस्य आणि एक रौप्य पदक पटकावले. त्यानंतर डिसेंबर 2025 मध्ये टोकियो येथे झालेल्या 25 व्या डेफ ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक मिळवत देशाचा गौरव वाढवला.आंतरराष्ट्रीय स्तरावर त्याने एकूण चार पदके जिंकली आहेत.
राष्ट्रीय पातळीवरही त्याची कामगिरी तितकीच उज्वल आहे.विविध स्पर्धांमध्ये सहा सुवर्ण,सात रौप्य आणि एक कांस्य अशी एकूण 14 पदके त्याच्या नावावर आहेत.राज्य स्तरावरही त्याने आपली छाप सोडली आहे.याशिवाय 2016-17 मध्ये दिव्यांग क्रीडा पुरस्कार आणि 2022-23 मध्ये गुणवंत खेळाडू पुरस्कार मिळवणारा तो धाराशिव जिल्ह्यातील पहिला दिव्यांग नेमबाज ठरला आहे.
