धाराशिव - तालुक्यातील वरवंटी येथे मंगळवार, 24 मार्च ते 31 मार्च 2026 या कालावधीत वरवंटी येथे अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. सप्ताह कालावधीत महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार व प्रवचनकारांची सेवा होणार आहे. सप्ताह कालावधीत दररोज काकडा भजन, ज्ञानेश्वरी पारायणी, गाथा भजन, महिला हरिभजन, हरिपाठ, हरिकीर्तन, हरिजागर असे विविध कार्यक्रम संपन्न होणार आहेत. सप्ताहाचे यंदा 33 वे वर्ष आहे.
गावातील दक्षिणमुखी हनुमान मंदिरात आयोजित या सप्ताहात 24 मार्च रोजी सकाळी टाळ, मृदंग, वीणा, ज्ञानेश्वरी तुकाराम गाथा पूजन जि.प. बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता नितीन भोसले व ग्रामस्थांच्या वतीने करण्यात येईल. या दिवशी विनोदाचार्य विठ्ठल भुतेकर (आळंदी देवाची) यांची कीर्तनसेवा होणार आहे. दि. 25 मार्च रोजी भागवताचार्य रमाकांत महाराज शास्त्री (आळंदी देवाची) तर दि. 26 रोजी राम नवमीदिवशी सकाळी हभप अभिमन्यू महाराज घाडगे, खुनेश्वर तर रात्री कृष्णकृपांकित अंकिताताई घुले महाराज यांची कीर्तनसेवा होईल. दि. 27 रोजी झी टॉकीज फेम हभप शुभम महाराज वसंतगडकर, दि. 28 रोजी हभप अॅड.पांडुरंग नरहरी लोमटे महाराज यांची कीर्तनसेवा तर रात्री 10 वाजता संदिप मोहिते व अतुल हातेकर यांची भारूडाची जुगलबंदी होणार आहे. दि. 29 रोजी हभप गायनाचार्य शंकर महाराज गवळी (आळंदी देवाची), दि. 30 रोजी हभप शिवदास महाराज जंगले शास्त्री (मोटीवाडी) यांची कीर्तनसेवा होणार आहे.
दि. 31 मार्च रोजी हभप रामेश्वर महाराज मते (शहाजानपूर, लोणी) यांचे काल्याचे कीर्तन होईल. त्यानंतर साहेबराव देशमुख यांच्या वतीने महाप्रसाद होऊन सप्ताहाची सांगता होणार आहे. या सप्ताह सोहळ्याचा परिसरातील भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन वरवंटी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.
