भूम :- धनगर समाजाला अनुसूचित जमाती (एस.टी.) आरक्षणाची अंमलबजावणी व्हावी या मागणीसाठी जय हनुमान ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष सामाजिक नेते सुरेश भाऊ कांबळे यांच्या पुढाकाराने धनगर समाजाच्या शिष्टमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक मुख्यमंत्री देवेंद्र भाऊ फडणवीस यांच्यासमवेत मुंबई येथे संपन्न झाली. या बैठकीस मंत्री गिरीश महाजन यांचीही उपस्थिती होती.
धनगर समाजाच्या प्रलंबित असलेल्या एस.टी. आरक्षणाच्या प्रश्नावर थेट चर्चा व्हावी आणि समाज बांधवांचे म्हणणे सरकारपर्यंत पोहोचावे या उद्देशाने ही बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी सुरेश भाऊ कांबळे आणि धनगर समाजाचे नेतेमंडळी यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर समाजाच्या विविध मागण्या मांडल्या.
बैठकीदरम्यान समाजातील प्रतिनिधींनी आपल्या भावना, अडचणी आणि एस.टी. आरक्षणाची अंमलबजावणी करण्याची मागणी थेट मुख्यमंत्र्यांसमोर मांडली.
सुरेश भाऊ कांबळे यांनी सांगितले की, धनगर समाजाला एस.टी. आरक्षणाचा लाभ मिळावा ही समाजाची अनेक वर्षांची मागणी आहे. या संदर्भात शासनाने लवकरात लवकर ठोस निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. समाज बांधवांचा आवाज शासनापर्यंत पोहोचवण्यासाठी पुढील काळातही प्रयत्न सुरू राहतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
भेटी प्रसंगी, दिपक बोराडे साहेब, विजय तमनर, अनंत बनसोडे, मोहन नाना देवकते , अॅड. गणेश कोल्हे , महादेव अर्जुन , बिरु कोळेकर , कृष्णा आलदर यांच्या शिष्ट मंडळाने मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडवणीस साहेबांची भेट घेऊन सकारात्मक चर्चा झाली असल्याचे या बैठकीमुळे धनगर समाजाच्या आरक्षणाच्या प्रश्नाला नव्याने गती मिळण्याची अपेक्षा समाज बांधवांकडून व्यक्त केली जात आहे
