कळंब (प्रतिनिधी)-  कळंब शहरातील मुस्लिम बांधवांना ईद दिवशी नमाज अदा करण्यासाठी ईदगाह मैदान म्हणून मंजूर करण्यात आलेली जागा अद्याप उपलब्ध करून देण्यात न आल्याने नाराजी व्यक्त होत असून, या संदर्भात महाविकास आघाडीच्या नगरसेवकांनी थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव घेतली आहे.

कळंब नगरपरिषदेच्या दिनांक 22 जुलै 2021 रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेत ठराव क्रमांक 490 नुसार सर्वे क्रमांक 7 मधील जागा ईदगाह मैदानासाठी मंजूर करण्यात आली होती. या जागेसाठी तत्कालीन पालकमंत्री तानाजीराव सावंत यांच्या माध्यमातून पाठपुरावा करण्यात आला होता. त्यानंतर भूमी अभिलेख विभागाकडून सदर जागेची मोजणीही करण्यात आली. मात्र प्रशासकीय कालखंडात हा विषय प्रलंबितच राहिला.

नवीन नगरपरिषद सभागृह अस्तित्वात आल्यानंतर दिनांक 23 फेब्रुवारी 2026 रोजी नगराध्यक्षा व मुख्याधिकारी यांना निवेदन देत रमजान महिन्यात सदर जागेची स्वच्छता करून ईद दिवशी नमाज पठणासाठी उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी महाविकास आघाडीच्या नगरसेवकांनी केली होती. परंतु पालिका प्रशासनाकडून याकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.

या पार्श्वभूमीवर सोमवार, 9 मार्च रोजी धाराशिवचे जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन महाराष्ट्र नगर परिषद अधिनियम 1965 च्या कलम 309 अंतर्गत असलेल्या अधिकारांचा वापर करून ईदगाह मैदानासाठी मंजूर जागा मुस्लिम समाजाला तात्काळ उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी करण्यात आली. यावेळी गटनेते संजय मुंदडा, नगरसेवक मोहसीन मिर्झा, नगरसेवक सागर मुंडे आणि नगरसेवक जमील खुरेशी उपस्थित होते. दरम्यान, जिल्हाधिकाऱ्यांनी हा विषय तात्काळ मार्गी लावण्याचे आश्वासन दिल्याची माहिती प्रतिनिधींनी दिली.

 
Top